RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारतीय सैन्याचे भगवेकरण’ करण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य 

Altered राजकीय | Political

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय सैन्याला शुद्ध ठेवण्यासाठी तिचे भगवेकरण करण्याचा आदेश दिला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून मोहन भागवत यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मोहन भागवत म्हणतात की, “आम्ही मोदींना आमचा निर्णय स्पष्टपणे सांगितला आहे की भारताची सेना पवित्र ठेवायची असेल, तर तिचे भगवाकरण करावे लागेल. भारतीय सेनेतून त्या सर्व अछूतांना बाहेर काढावे लागेल, जे आपल्या सेनेला आतून पोखरत आहेत. मोदींनी माझ्या पायांवर पडून सांगितले की त्यांच्यावर दबाव आहे, पण मी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर 2028 पर्यंत भारतीय सेनेतून 50 टक्क्यांपेक्षा जास्त नॉन-कास्ट हिंदूंना काढून टाकले नाही, तर समजून घ्या की मोदी जातील आणि योगी येतील. नितीश कुमार आमचा बालक आहे आणि आम्ही मोदींना सांगितले आहे की जर नितीश कुमार यांचा राजीनामा मागितला गेला, तर पुढचा राजीनामा तुमचाच असेल.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “RSS मुर्दाबाद, शेवटी मोहन भागवतचे पितळे उघडे पडले, हा व्हिडिओ सर्व SC, ST, OBC लोकांना प्रयत्न पोहचविनयचे काम करा.”

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी असे कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर अशी बातमी अढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात झालेल्या संघाच्या “100 व्याख्यान माला” कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

सीएनएन न्यूज18 च्या युट्यूब चॅनलने 21 डिसेंबर 2025 रोजी मोहन भागवत यांच्या संपूर्ण भाषणाचे थेट प्रक्षेपण केले होते.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, या ठिकाणी मोहन भागवत कुठेही भारतीय सैन्याच्या ‘भगव्याकरण’ किंवा पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याशी संबंधित कोणतेही वक्तव्य करत नाही. या उलट त्यांनी संघाकडे भाजपच्या नजरेतून पाहू नये असे आवाहन केले. तसेच बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली.

सदरील भाषणाचा व्हिडिओ आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर आणि युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

अर्थात मूळ व्हिडिओला एआयच्या साह्याने एडिट करुन मोहन भागवत यांनी न केलेले वक्तव्य खोट्या दाव्यासह पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे एडिट केलेला आहे. मुळात मोहन भागवत भाषणात ‘भारतीय सैन्याच्या भगवेकरणाबद्दल’ बोलत नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Avatar

Title:RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ‘भारतीय सैन्याचे भगवेकरण’ करण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य 

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *