
हैदराबाद येथील युवतीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्यानंतर दिल्लीतील निर्भया प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपींनाही लवकरात लवकरच फाशी देण्यात यावी. त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. समाजमाध्यमांमध्ये निर्भया प्रकरणातील चार गुन्हेगारांना 16 डिसेंबर रोजी फाशी देण्यात येणार असल्याची माहिती पसरत आहे. गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा या पेजवरही अशीच एक पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
निर्भया प्रकरणातील आरोपींना 16 डिसेंबरला फाशी देण्यात येणार आहे का, याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला कोकण नाऊ या संकेतस्थळावरील 10 डिसेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्ताच्या शीर्षकात निर्भया बलात्कार प्रकरण; आरोपींना 16 डिसेंबरला फाशी? असे असे म्हटले आहे. या आरोपींना 16 डिसेंबरला फाशी होणार का याबाबत संदिग्धता असल्याने या ठिकाणी शीर्षकात प्रश्नचिन्ह देण्यात आल्याचे आपण पाहू शकतो.
दैनिक सामना, लोकमत या संकेतस्थळांनीही अशाच स्वरुपाचे वृत्त 10 डिसेंबर 2019 रोजी दिलेले आहे. या सर्व वृत्तांमध्ये आरोपींना 16 डिसेंबरला फाशी होणार का याबाबत संदिग्धता असल्याचे दिसून येते. त्यानंतर आम्हाला टाईम्स नाऊ मराठी या संकेतस्थळावरील 12 डिसेंबर 2019 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्ताच्या शीर्षकात म्हटले आहे की, निर्भया प्रकरणातील निर्णयाच्या समिक्षा याचिकेवर 17 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
टाईम्स नाऊ मराठीचे वृत्त / Archive
निर्भया प्रकरणातील पुनरावलोकन याचिकेवर 17 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याने त्यापुर्वी आरोपींना फाशी होणार नसल्याचे म्हणजेच 16 डिसेंबरला फाशी होणार नसल्याचे यातून स्पष्ट होते. एएनआय या वृत्तसंस्थेच्या खालील व्हिडिओतही आपण निर्भयाची आई 17 डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी असल्याचे सांगत असल्याचे आपण पाहू शकतो.
निष्कर्ष
निर्भया प्रकरणातील आरोपींना कधी फाशी देण्यात येणार आहे हे अजुन निश्चित झालेले नाही. या प्रकरणात पुनरावलोकन याचिकेवर अद्याप सुनावणी सुरू आहे. समाजमाध्यमात पसरत असलेली आरोपींना 16 डिसेंबर 2019 रोजी फाशी देण्यात येणार असल्याची माहिती असत्य आहे.

Title:Fact : निर्भया प्रकरणातील आरोपींना 16 डिसेंबरला फाशी होणार नसल्याचे स्पष्ट
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
