वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कर्जमाफी इतकाच टोलमाफी हा विषय “गंभीर” आहे. टोल न भरण्यासाठी विविध बहाणे आणि वशिले वापरले जातात. परंतु, वकिल या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी टोलमाफीच मिळवली! वाचून आश्चर्य वाटलं ना? सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजनुसार, वकिलांना आता महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केवळ बार कौन्सिलचे ओळखपत्र दाखवायचे आणि टोलमुक्त प्रवास करायचा, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

पुरावा म्हणून केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्री नितीन गडकरी यांच्या खासगी सचिवांच्या नावे असलेले एक पत्रदेखील दिलेले आहे. मग सत्य काय आहे? वकिलांना खरंच टोलमाफी मिळाली का? केंद्र सरकारने खरंच असा काही निर्णय घेतला का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूल पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमधील पत्राचे नीट वाचन केल्यावर कळते की, यामध्ये कुठेही टोलमाफी दिल्याचा उल्लेख नाही. चेन्नईस्थित वकील आर. भास्करदास यांनी 11 नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्रालयाला पत्र पाठवून वकिलांना टोलमाफी मिळावी अशी मागणी केली होती. हे पत्र मिळाल्याचे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चेयरमनकडे ते पुढे पाठविण्यात आल्याची माहिती, केंद्रीय मंत्र्यांचे खासगी सचिव संकेत भोंडवे यांनी या पत्रात दिली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने संकेत भोंडवे यांच्या कार्यालयाशी यासंदर्भात संपर्क केला असता सोशल मीडियावर फिरणारा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सांगण्यात आले. वकिलांना टोलमाफी दिल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. तसेच अशी खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरूद्ध तक्रारही दिल्याची माहिती कळविण्यात आली.

हेसुद्धा वाचाः बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्रालयाचे अधिकृत ट्विटर खात्यावरील एक रीट्विट आढळले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 11 डिसेंबर रोजी वकिलांना टोलमाफी दिल्याचे वृत्त फेटाळून लावलेले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गांवर टोल फीच्या नियमांनुसार टोल आकारला जातो. आणि या नियमांमध्ये वकिलांना कोणतीही सूट अथवा माफी दिलेली नाही.

अर्काइव्ह

यावरून हे स्पष्ट होते की, वकिलांना टोलमाफी दिल्याची माहिती केवळ अफवा आहे.

मग ही अफवा का पसरत आहे?

टाईम्स ऑफ इंडियाने 11 डिसेंबर रोजी दिलेल्या बातमीनुसार, चेन्नईस्थित वकिलाने टोलमाफीचे पत्र पाठविल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननेसुद्धा (IMA) डॉक्टर्ससाठीदेखील अशी सूट देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यानंतर इंटरनेटवर वकिलांना टोलमाफी दिल्याचे मेसेज व खोटे लेटर पसरू लागले. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ट्विटरवर याबाबत खुलासा केला.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया

निष्कर्ष

वकिलांना टोलमाफी देण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. तुमच्याकडेदेखील असे संशयास्पद मेसेज असल्यास त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (9049043487) क्रमांकावर पाठवा.

Avatar

Title:वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •