
सोशल मीडियावर सध्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने एक ग्राफिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये स्वीकारल्या जाणार नाहीत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाइन क्रमांक (9049053770) वर पाठवून या दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली.
तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे दावा?
बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव असलेल्या व्हायरल ग्राफिकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत. या नोटा फक्त आरबीआयच्या अधिकृत केंद्रांवरच जमा करता येतील.
तसेच, अशा नोटा 30 जून 2026 पूर्वी बँकेत जमा करून घ्याव्यात किंवा बदलून घ्याव्यात, अन्यथा त्यानंतर स्थानिक शाखांना त्या स्वीकारण्याचे बंधन राहणार नाही, असेही या ग्राफिकमध्ये म्हटले आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम, जर आरबीआय किंवा भारत सरकारने जुन्या नोटांबाबत असा महत्त्वाचा निर्णय घेतला असता, तर त्याची अधिकृत घोषणा झाली असती आणि त्याची व्यापक बातमी सर्व प्रमुख माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली असती. मात्र, अशा कोणत्याही निर्णयाची अधिकृत माहिती आढळली नाही.
त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांची पडताळणी केली. व्हायरल होत असलेले ग्राफिक तेथे आढळले नाही.
उलट, बँक ऑफ महाराष्ट्रने 27 जून रोजी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करून हे ग्राफिक बनावट असल्याचे स्पष्ट केले.
बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2005 पूर्वीच्या चलनी नोटा 30 जून 2026 नंतर अवैध ठरणार असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. या सर्व नोटा आजही कायदेशीर चलन आहेत आणि त्यांच्या वैधतेवर कोणतीही अंतिम मुदत लागू करण्यात आलेली नाही.
याशिवाय, 26 जून रोजी बँक ऑफ महाराष्ट्रने सोशल मीडियावरही या दाव्याचे खंडन केले. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ही पोस्ट रिपोस्ट करून त्यातील माहितीला दुजोरा दिला.
निष्कर्ष
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने व्हायरल होत असलेले ग्राफिक बनावट आहे. तसेच, आरबीआयने 2005 पूर्वीच्या 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा किंवा त्यांच्या वापरावर कोणतीही अंतिम मुदत लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या नोटा आजही पूर्णपणे वैध आहेत आणि नेहमीप्रमाणे व्यवहारात वापरता येतात. सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)


