
तुर्की आणि उत्तर-पश्चिम सिरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरसुद्धा तेथे वारंवार हादरे जाणवत आहेत. भूकंपाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर तेथील भयावह परिस्थितीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
अशाच एका क्लिपमध्ये दोन इमारती कोसळतानाचा दिसतात. हा व्हिडिओ तुर्की भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून तो तुर्कीमधील नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन इमारती कोसळताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी वाताहात झाली.”
मुळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील आहे.
डेली मेलच्या बातमीनुसार, 21 जून 2021 रोजी अमेरिकेतील मियामी शहराजवळील सर्फसाइड भागात 12 मजली अपार्टमेंट कॉम्प्लेक्स कोसळले होते. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू तर, 11 जण जखमी व 99 लोक बेपत्ता झाले होते.

इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 35 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते नव्वदच्या दशकापासून ही इमारत थोडी-थोडी करत खचत होती. या घटनेनंतर जुन्या इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिल होते.
अमेरिकेतील इमारत कोसळण्याचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.
तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप
तुर्की आणि उत्तर-पश्चिम सिरियामध्ये झालेल्या भूकंपांमुळे येथे मोठी जीवितहानी झाली आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या महितीनुसार टर्की आणि सिरीयामध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जणांचा मृत्यू झाला आहे.
तुर्की सरकारकडून अन्य देशांना मदतीचे आवाहन केले आहे. भारताकडून तेथे दोन बचावपथक आणि वैद्यकीय मदतही पाठवण्यात आली आहे.
तुर्की आणि सिरियामधील भूकंपाचे व्हायरल व्हिडिओ आपण खाली पाहू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, इमारत कोसळण्याचा हा व्हायरल व्हिडिओ तुर्की येथील नाही. अमेरिकेतील ही घटना एक वर्षापूर्वीची आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अमेरिकेतील जुना व्हिडिओ तुर्कीत भूकंपामध्ये इमारत कोसळण्याचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: False
