
अमृतसर येथील रतनसिंह चौकात हॅलिकॉप्टर आणि ट्रकच्या अपघाताची घटना घडली असून हे फक्त भारतातच घडू शकते, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ भारतातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक द्दश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी ब्रिटनमधील डेली मेल या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील 21 जानेवारी 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार पोलिसांचे हॅलीकॉप्टर उड्डाणाच्या प्रयत्नात असताना त्याचे पंख मालमोटारीच्या छप्पराला धडकल्याची घटना ब्राझीलमध्ये रियो ब्रांको या शहरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील या वृत्तात समाविष्ट करण्यात आला आहे. हा तोच व्हिडिओ असल्याचे दिसून येते. जो भारतात अमृतसरचा म्हणून व्हायरल होत आहे.

डेली मेलच्या संकेतस्थळावरील वृत्त / संग्रहित
त्यानंतर युटूयूबवरही 25 जानेवारी 2020 रोजी द गेमिंग फायर फायटर या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे दिसून आला. जैववैद्यकीय कचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकची हॅलिकॉप्टरबरोबर धडक झाल्याची ही घटना ब्राझीलमध्ये घडल्याचे या व्हिडिओ खाली देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे.
यातून हे स्पष्ट झाले की, ही घटना अमृतसर येथे घडली नसून ब्राझीलमधील रियो ब्रांको या शहरात जानेवारी 2020 मध्ये घडलेली आहे.
निष्कर्ष
हॅलीकॉप्टर ट्रकला धडकल्याची घटना अमृतसर शहरात घडल्याचे असत्य आहे.

Title:हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे ब्राझीलमधील; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
