
एका ओपन जिममधील उपकरण आपोआप हालताना दिसत असल्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. कोणताही व्यक्ती त्यावर बसलेला दिसत नाही. त्यामुळे भूतच व्यायाम करीत असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविली जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो पाठवून त्याचे सत्य काय याची विचारणा केली.
काय आहे व्हिडियोमध्ये?
व्हिडियोत ओपन जिममध्ये असलेले एक उपकरण आपोआप हालचाल करीत असल्याचे दिसते. काही पोलिस कर्मचारी या उपकरणाची मोबाईलमध्ये शुटिंग घेत आहेत. झाशी शहरातील एका बागेतील या उपकरणावर कोणीही बसलेले नसताने ते आपोआप हालत असल्यामुळे लोक भूत व्यायाम करत असल्याचा कयास लावत आहेत. युजरने कॅप्शन लिहिली की, हेल्थ कॉन्शियस भूत रात्री दोन वाजता व्यायाम करताना! झाशी (उत्तरप्रदेश).

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडियोबाबात शोध घेतला असता झाशी पोलिसांनी या व्हिडियोबाबत 13 जून 2020 रोजी केलेले ट्विट आढळले. भूताचा म्हणून हा व्हिडियो व्हायरल झाल्यावर पोलिसांनी याबाबत तपास केला. त्यानुसार माहिती समोर आली की, उपकरणाला मोठ्या प्रमाणात ग्रीस लावण्यात आले होते. त्यामुळे एकदा जरी उपकरणाला हलविले तर ते काही वेळ तसेच हालचाल करीत राहते. या उपकरणाचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर आमची एक टीम घटनास्थळी पोहचली व त्यांनी स्वतः प्रात्याक्षिक करून पाहिले. त्याचा हा व्हिडियो आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हिडियोद्वारे खोटा दावा करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, फॅक्ट क्रेसेंडोने झाशीचे पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, हा व्हिडियो झाशीच्या नंदपुरा भागीत काशीराम बागेतील आहे. उपकरणावर मोठ्या प्रमाणात ग्रीस लावण्यात आल्यामुळे ते एकदा हलविल्यावर काही सेकंद तसेच फिरत राहते. उपकरण आपोआप चालत असल्याचा व्हिडियो शेयर करून चुकीचे दावे करण्यात येत हेत. त्यावर विश्वास ठेवू नये.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, ओपन जिममधील उपकरण आपोआप हालचाल करताण्याचा व्हिडियो भूताचा नाही. उपकरणाला अधिक ग्रीस लावण्यात आले होते. त्यामुळे ते एकदा ओढल्यावर काही काळ असेच चालत राहते.

Title:भूत व्यायाम करत असल्याच्या व्हिडियोचे काय आहे रहस्य? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
