नरेंद्र मोदींनी आधी स्वतः कचरा ठेवून नंतर तो गोळा करण्याचा बनाव केला का? पाहा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूमधील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर प्लॅस्टिक वेचतानाचा व्हिडियो सध्या प्रचंड गाजत आहे. सकाळी सकाळी अनवाणी चालत मोदींनी समुद्र किनाऱ्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा स्वतः गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. या व्हिडियोवरून त्यांची प्रशंसा आणि टीका दोन्ही होत आहे.

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, केवळ दिखाव्यासाठी मोदींनी हा बनाव केला. सध्या व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये मोदी स्वतः किनाऱ्यावर आधी कचरा ठेवताना दिसतात. तसेच मोदी स्वच्छता करीत असल्याचा व्हिडियो तयार करण्यासाठी किनारपट्टीवर कॅमेऱ्याची मोठी टीम सज्ज असल्याचेही फोटो फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक 

सुमारे 40 सेकंदाच्या या व्हिडियो क्लिपमध्ये मोदी एका व्यक्तीच्या हातातून कचऱ्याची पिशवी घेतात. नंतर एक-एक करीत प्लॅस्टिक समुद्र किनाऱ्यावर पसरवितात. सोबत लिहिले की, बर झालं दोन्ही विडिओ हाती लागले नाहीतर सगळे मंदाड भक्त मोदीला बघुन स्वच्छतेत गुंतली असती.. कचरासेठने अगोदर कचरा पसरवला नंतर गोळा केला.. इतका ढोंगी मानुस मी तरी नाही बघितला.

मग खरं काय आहे?

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्विटवरवर महाबलीपूरम समुद्र किनाऱ्यावर साफसफाई करतनाचा व्हिडियो शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, महाबलीपूरम येथील समुद्र किनारी सकाळ सकाळी अर्धा तास साफसफाई केली. प्लॅस्टिकचा कचरा वेचून तो हॉटेलचा स्टाफ जयराज यांच्याकडे दिला. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याची आणि ती जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच आपण सर्व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी प्रयत्न करूयात.

अर्काइव्ह

सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये पंतप्रधान मोदी चप्पल न घालता समुद्र किनाऱ्यावर पडलेला कचरा, प्लॅस्टिक बॉटल एका पिशवीत भरतात. कचरा गोळा केल्यानंतर ती पिशवी खांद्यावरून घेऊन जाताना दिसतात. शेवटी ती हॉटेल कर्मचाऱ्याजवळ देतात. 

सदरील व्हिडियोचे सत्य बाहेर आणल्याचा दावा करणाऱ्या क्लिपमध्ये मात्र मोदी आधी हॉटेल कर्मचाऱ्याकडून कचऱ्याची पिशवी घेतात, मग एक-एक करीत कचऱ्याच्या वस्तू किनाऱ्यावर पसरवितात. म्हणजे केवळ साफसफाईचा व्हिडियो तयार करण्यासाठी मोदी यांनी आधी स्वतः कचरा टाकला आणि मग तो उचलण्याचे नाटक केले, असे या व्हिडियोतून दाखवले आहे. परंतु, सत्य वेगळेच आहे. 

खाली दिलेल्या व्हिडियो तुलनेत तुम्ही पाहू शकता की, व्हायरल होत असलेली क्लिप खरं तर ओरिजनल व्हिडियोला रिव्हर्स इफेक्ट देऊन तयार केलेली आहे. मूळ व्हिडियोत मोदी शेवटी कर्मचाऱ्याकडे कचरा सोपवतात. यालाच व्हायरल क्लिपमध्ये उलटे दाखवून कर्मचाऱ्याकडून कचरा घेताना दाखविले. ओरिजनल व्हिडियोमध्ये जेथे जेथे मोदी कचरा उचलतात, तोच भाग फक्त एडिट करून रिव्हर्स केला आहे. त्यामुळे असे भासते की, ते कचरा ठेवत आहेत. शिवाय खरी क्लिप तीन मिनिटांची आहे आणि व्हायरल क्लिप फक्त 40 सेकंदाची आहे.

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महाबलीपूरम समुद्र किनाऱ्यावर कचरा ठेवत असल्याचा व्हिडियो खोटा आहे. साफसफाईच्या ओरिजनल व्हिडियोला एडिट करून रिव्हर्स इफेक्ट देऊन ती क्लिप तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून शेयर करू नका. असे शंकास्पद व्हिडियो किंवा फोटो तुमच्याकडे असतील तर ते फॅक्ट क्रेसेंडोकडे तथ्य पडताळणीसाठी 9049043487 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवा. 

Avatar

Title:नरेंद्र मोदींनी आधी स्वतः कचरा ठेवून नंतर तो गोळा करण्याचा बनाव केला का? पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False