ओम म्हटल्यावर डोंगराएवढे उंच उडणाऱ्या पाण्याच्या व्हिडियोचे रहस्य काय?

False आंतरराष्ट्रीय

ओम (ॐ) या शब्दाच्या उच्चाराचे महत्त्व सांगणारे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत ऐकले, पाहिले आणि वाचले असतील. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडियोमध्ये केला जाणारा दावा आश्चर्यचकित करणारा आहे. व्हायरल पोस्टनुसार, थायलंडमध्ये एका पर्वताच्या कुशीत अशी जागा आहे जेथे जोरात ओम (ॐ) असे ओरडले असता डोंगराएवढ्या उंचीपर्यंत पाणी उडते. पुरावा म्हणून 15 सेंकदाचा व्हिडियोसुद्धा दिलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये काय आहे?

पोस्टमधील व्हिडियो क्लिपमध्ये एक मुलगी ओरडत असताना डोंगराच्या पायथ्यापासून पाण्याचा एक प्रवाह आकाशात उंच-उंच उडू लागतो. सोबत हिंदीतून लिहिले की, थायलंडमध्ये एका पर्वताच्या पायथ्याशी एक छोटा झरा आहे. बाजूच्या पर्वतावर ओमचे उच्चारण केल्यावर पाण्याचा प्रवाह पर्वताहूनही अधिक उंच आकाशात उडतो. बौद्ध साधूंच्या एका संप्रदायाने अशी चमत्कारीक बाब तयार केली आहे. पाण्याचे वजन आणि गुरुत्वाकर्षण बल असून केवळ आवाजाच्या कंपणाने पाणी एवढ्या उंच कसे उडते याचे कारण केवळ वैज्ञानिकच सांगू शकतात. कारण केवळ ओम म्हटल्यावर पाणी उडते. हे एक आश्चर्यच आहे. अनेक भारतीयांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.

तथ्य पडताळणी

पोस्ट अथवा व्हिडियोमध्ये थायलंडमध्ये ही जागा कुठे आहे याची माहिती दिलेली नाही. या व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी सर्वप्रथम इंटरनेटवर OM Sound Magical Fountain Thailand असे सर्च केले. तेव्हा युट्यूबर न्यू चायना टीव्ही नावाच्या चॅनेलने 14 नोव्हेंबर 2018 अपलोड केलेला व्हिडियो आढळला. यामध्ये विविध लोक माईकमध्ये ओरडत असून त्यामुळे हवेत उंचावर पाणी उडत असल्याचे दिसते. व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही जागा चीनमधील शांक्षी प्रांतातील Cangshan Mountain येथील आहे. व्हिडियोच्या शीर्षकात आवाजाच्या बळावर उडणारे कारंजे असे म्हटलेले आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर हिमालया म्युझिक फाऊंटेन नावाच्या एका युट्यूब चॅनेलवरील व्हिडियो समोर आला. 10 एप्रिल 2018 रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती जोरजोराने ‘आ’ ओरडते आणि उंच कारंजे उडताना दिसते. व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, हिमालया म्युझिक फाउंटेन कंपनीने थाउजंड बुद्धा केव्ह येथे आवाजाने नियंत्रित होणारे कारंजे बसविण्याचा हुनान टुरिस्ट डेव्हलोपिंग कॉर्पोरेशनशी करार केला आहे.

या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, कंपनीचे पूर्ण नाव Changsha Himalaya Music Fountain Equipment Company Limited असे आहे. कारंजे (फाउंटेन) बनविणारी ही एक लोकप्रिय कंपनी आहे. जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी एलईडी फाउंटेन, म्युझिकल फाउंटेन, ग्राफिकल वॉटरफॉल, वॉटर लेझर शो, वॉटर स्टॅच्यू अशा विविध प्रकारचे फाउंटेन बसविले आहेत.

काय आहे Voice-controlled Shout Fountain?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडियोत दिसणाऱ्या कारंज्याला Voice Control Fountain किंवा Yell Fountain किंवा Shout Fountain असे म्हणतात. यामागचे तंत्रज्ञान थोडक्यात असेः माईकमध्ये ओरडण्याचा आवाज सिग्नलमध्ये रुपांतरित केला जातो. मग हे सिग्नल कंट्रोल सिस्टमकडे पाठविण्यात येतात. त्याद्वारे उडणारे कारंजे कंट्रोल सिस्टमद्वारे नियंत्रित केले जाते. कंपनीतर्फे 22 मीटर, 30 मी., 40 मी., 50 मी., आणि 70 मीटर उंचीवर कारंजे उडवणारे फाउंटेन तयार केले जातात.

मूळ आर्टिकल येथे वाचा – Yell Fountainअर्काइव्ह

निष्कर्ष

व्हायरल होत असलेला व्हिडियो थायलंडमधील नसून, चीनमधील आहे. चीनमधील Cangshan Mountain प्रांतामध्ये हे येल किंवा शाउट फाउंटेन बसविलेले आहे. यामध्ये आवाजाद्वारे पाण्याचे कारंजे अगदी 70 मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे माईकमध्ये ओम नाही तर काहीही ओरडले तरी पाणी उडते. हे कारंजे कोण्या बौद्ध संप्रदायाने नाही तर हिमालया म्युझिकल फाउंटेन नावाच्या कंपनीने तयार केलेले आहे. त्यामुळे तसेच ओम म्हटल्यामुळे कारंजे उडण्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:ओम म्हटल्यावर डोंगराएवढे उंच उडणाऱ्या पाण्याच्या व्हिडियोचे रहस्य काय?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False