नवीन वाहतूकदंड लागू झाल्यानंतर नितीन गडकरींनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली का? वाचा सत्य!

False राजकीय

देशात 1 सप्टेंबरपासून नवीन वाहतूकदंड आकारण्यात आले आहेत. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली असून, यामध्ये दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी टीकेची झोड उठविली आहे.

याच पार्श्वभूमीवर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचाच हेल्मेट न घालता दुचाकी चालवतानाचा व्हिडियो व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये ते नागपूर येथील संघाच्या कार्यालयात दुचाकीवरून जाताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या बातमीतील हा व्हिडियो आहे. यामध्ये नितीन गडकरी दुचाकी चालवत नागपुरच्या संघ कार्यालयात जाताना दिसतात. व्हिडियोतील वृत्तनिवेदक गडकरींनी हेल्मेट घातले नसल्याचे सांगतो. नुकतेच महिलांसाठीसुद्धा हेल्मेट घालणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला असताना खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरीच विनाहेल्मेट गाडी चालवत असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

अनेक युजर्सने ही व्हिडियो क्लिप शेयर करून लिहिले की, ज्या नितीन गडकरी साहेबांनी जनतेसाठी लुटयाचे नियम बनवले आणि लुटायलाही सुरू केले आणि गडकरी साहेब स्वतः नियम खिशात आणि सत्तेचा मज्जा डोक्यात घालून बिना हेल्मेट दुचाकी बिनधास्त चालवतात. दुसऱ्याने लिहिले की, नितीन गडकरी स्वतः विनाहेल्मेट! लोकांना कायद्याविषयी ज्ञान देणे व स्वतः विना हेल्मेट फिरणे. मारा फाईन!

तथ्य पडताळणी

सदरील बातमी एनडीटीव्ही चॅनेलची आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, हा व्हिडियो 5 वर्षांपूर्वीचा आहे. एनडीटीव्हीच्या वेबसाईटवरील बातमीनुसार, 25 ऑक्टोबर 2014 रोजी नितीन गडकरी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बैठकीसाठी गेले होते. जसे की, तुम्ही खाली दिलेल्या फोटोत पाहू शकता, यावेळी ते विनाहेल्मेट दुचाकी चालवत होते. 

मूळ बातमी येथे वाचा – NDTVअर्काइव्ह

मग एनडीटीव्हीच्या युट्यूब चॅनेलवर 25 ऑक्टोबर 2014 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडियो आढळला. गडकरी यांनी संघाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीची ही बातमी आहे. केंद्रीय मंत्र्याने असे  विनाहेल्मेट गाडी चालविणे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने चुकीचे आहे, अशी टीका होत असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

इंडिया टुडे, सीएनएन-न्यूज 18, हेडलाईन्स टुडे, न्यूज एक्स यासह विविध वृत्तवाहिन्यांनी गडकरींच्या पाच वर्षांपूर्वीच्या विनाहेल्मट सवारीची बातमी केली होती. यामुळे गडकरींवर चहुबाजुने टीका करण्यात आली होती. एवढेच नाही तर, छत्तीसगडच्या ट्रॅफिक पोलिसांनी 2015 साली रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी तयार केलेल्या बॅनरवर गडकरी यांचे हेल्मेट न घातलेले कार्टुन छापले होते.

निष्कर्ष

गडकरी विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचा व्हिडियो 2014 मधील आहे. नवीन वाहतूकदंड लागू झाल्यानंतर गडकरी यांनी विनाहेल्मेट गाडी चालविल्याचा तो व्हिडियो नाही. अनेकांनी तसे समजून हा व्हिडियो शेयर केला आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे तेव्हाही चूकच होते, आणि आताही नियमांचा भंगच आहे. परंतु, सदरील व्हिडियो जूना असून सध्याच्या नव्या वाहतूक दंड आकारणीच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा पसरविण्यात येत आहे.

Avatar

Title:नवीन वाहतूकदंड लागू झाल्यानंतर नितीन गडकरींनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवली का? वाचा सत्य!

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False