महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

Partly False सामाजिक

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज भ्रामक आहे. महाराष्ट्रात ही सेवा उपलब्ध नाही. 

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय. पोलीस आदेश महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राइड योजना सुरू केली आहे. जेथे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसेल, तेथे महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागू शकतात. हा क्रमांक २४x७ कार्यरत असेल. नियंत्रण कक्ष वाहन किंवा जवळपासचे PCR वाहन/SHO वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल. हे विनामूल्य केले जाईल. तुमच्या ओळखीच्या प्रत्येकीला हा संदेश पाठवा.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

मेसेजमधील माहितीच्या आधारे कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, 7837018555 हा क्रमांक पंजाबमधील लुधियाना शहरात पोलिसांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सेवेचा आहे. 

न्यूज-18 वेबसाईटनुसार, 2019 साली लुधियाना पोलिसांनी रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान वाहन नसणाऱ्या महिलांना घरी सुरक्षित पोहचविण्यासाठी मोफत राईडची सेवा सुरू केली होती. 

तत्कालिन पोलिस आयुक्त राकेश अगरवाल यांनी माहिती देताना सांगितले होते की, रात्री उशिरा घरी जाण्यासाठी व्यवस्था नसेल तर महिलांनी 1091 किंवा 7837018555 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिसांच्या वाहनातून महिलांना सुरक्षित घरी पोहचविण्यात येईल. 

ही हेल्पलाईन सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांत सुमारे तीन हजार कॉल आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. 

विविध शहरांच्या नावे हा मेसेज व्हायरल

लुधियानामध्ये ही सेवा सुरू झाल्यानंतर 1091 किंवा 7837018555 हे क्रमांक वेगवेगळ्या शहरांच्या नावाने महिलांसाठी मोफत राईड योजनेचे म्हणून व्हायरल होऊ लागले. 

बंगळुरू शहरातही 2019 मध्ये हे मेसेज व्हायरल झाले होते. त्यावेळ बंगळुरू पोलिसांनी सोशल मीडियावर फेक मेसेजचे खंडन केले होते. 

मूळ पोस्ट – फेसबुक

नागपूर शहरात ही सेवा आहे

महिलांना रात्री उशिरा सुरक्षित घरी पोहचविण्याची महाराष्ट्रात काही योजना आहे का याची माहिती घेतल्यावर कळाले की, नागपूर पोलिसांनीसुद्धा 2019 मध्ये अशी सेवा सुरू केली होती. 

नागपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर 4 डिसेंबर 2019 रोजी या सेवेची माहिती पोस्ट करण्यात आली होती. 

नागपूर शहरात रात्री 9 ते सकाळी 5 दरम्यान महिलांना घरी जाण्यासाठी मोफत राईड सेवा करण्यात आली होती. वाहन मिळवण्यासाठी 100, 1091 किंवा 07122561103 या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

फॅक्ट क्रेसेंडोने नागपूर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्यादेखील ही सेवा पुरविण्यात येते. 

औरंगाबाद पोलिसांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, औरंगाबादमध्ये अशी योजना नसली तरी महिलांनी रात्री-अपरात्री गरज पडल्यास दामिनी पथकाला संपर्क साधावा. त्यांना नक्कीच मदत केली जाईल. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्याची पोलिसांची मोफत राईड योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली नाही. 1091 आणि 7837018555 हे क्रमांक लुधियाना शहरातील हेल्पलाईनचे आहेत. महाराष्ट्रात केवळ नागपूर शहरात महिलांसाठी मोफत राईड योजना सुरू आहे. परंतु, इतर ठिकाणी गरज पडल्यास स्थानिक पोलिसांनी मदत मागितली जाऊ शकते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: PARTLY FALSE