गुजरातच्या भाजप आमदाराने मोदींवर दंगली करण्याचा आरोप केला का? वाचा या व्हिडिओचे सत्य

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमधील भाजप आमदारानेच मोदींवर खोट्या मुस्लिमांकडून दंगली घडवून आणतात असा आरोप केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला आहे. हा व्हिडिओ जुना असून आरोप करणारी व्यक्ती सध्या भाजप आमदार नाही. 

काय आहे दावा ?   

व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींवर आरोप लावताना ही व्यक्ती म्हणते की, “राजकारणी फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करतात आणि दंगली घडवतात. नरेंद्र मोदी लोकांच्या धार्मिक भावनेचा वापर करून राजकारण करतात. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना खोटे मुसलमान बनवून दंगली घडवतात. 2001 च्या निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांनी असेच केले होते.”

युजर्स व्हिडिओ शेअर करून लिहितात की, “भाजप गुजरातचे एक आमदारच सांगत आहे मोदी कसे आपल्याच कार्यकर्त्यांना मुसलमान बनवून दंगली घडवून आणतात.”

Archive

मुळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वींपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.  

रंगरेज नावाच्या युट्यूब चॅनेलवर 2017 साली हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यामध्ये या व्यक्तीचे नाव यतीन ओझा सांगितलेले आहे. ओझा यांनी मागच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मोदी-शहांवर दंगली घडवून आणल्याचा आरोप केला होता. 

यतीन ओझा कोण आहेत?

यतीन ओझा सध्या गुजरात उच्च न्यायालयातील वकील आहेत. तत्पूर्वी ते 1995 ते 2001 दरम्यान भाजपचे साबरमती येथील आमदार होते. 2001 नंतर त्यांनी भाजप पक्ष सोडला आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले. 

काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही निवडणूक लढविलेली होती, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. 

2012 साली त्यांनी पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. परंतु, लगेच भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ओझा सध्या कोणत्याही पक्षाशी संलग्नित नाहीत. 

लोकशक्तीच्या अनुसार, यतीन ओझा हे गुजरात उच्च न्यायालयात वकील आहेत आणि सलग 14 वेळा गुजरात हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 

ओझा जेव्हा आम आदमी पक्षाचे सदस्य होते तेव्हा त्यांनी व्हायरल व्हिडिओमधील मुलाखत देताना मोदी-शहांवर आरोप केले होते. 

फॅक्ट क्रेसेंडोने यातीन ओझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ जुना असून यंदाच्या गुजरात निवडणुकीशी याचा काही संबंध नाही. तसेच सहा वर्षांपूर्वी मी राजकारण सोडले आहे. सध्या मी गुजरात उच्च न्यायालयात वकिल आहेत.”  

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असून यातीन ओझा त्यावेळी भाजप आमदार नव्हते. जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरातच्या भाजप आमदाराने मोदींवर दंगली करण्याचा आरोप केला का? वाचा या व्हिडिओचे सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading