शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकले नाही; त्याने दुआनंतर केवळ फुंकर मारली

False सामाजिक

अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा फेक न्यूजचा बळी ठरला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शाहरुख खान थुंकला, असा दावा केला जात आहे.

लता मंगेशकर यांचे रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 92 व्या निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली. शाहरुख खानसुद्धा त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत आला होता.

मंगेशकर यांच्या पार्थिवाजळ दुआ केल्यानंतर शाहरुखने मास्क खाली करून थोडा वाकला. या क्षणाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की त्याने मास्क खाली करून थुंकून मंगेशकरांचा अपमान केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडिओविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा दावा असत्य आहे. 

काय आहे व्हिडिओमध्ये?

न्यूज चॅनेलच्या व्हिडिओमध्ये दिसते, की शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन करण्यासाठी चौथऱ्यावर चढतात. तो पुष्पचक्र ठेवतो आणि मग त्यानंतर दुआसाठी हात जोडतो. दुआ पढून झाल्यानंतर तो मास्क खाली करून पुढे वाकतो.

हा व्हिडिओ शेअर करून म्हटले जात आहे, की शाहरुख खान मास्क खाली करून मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकला.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

शाहरुख खानवर आपत्तीजनक जनक आरोप केल्या जाऊ लागल्यावर अनेकांनी समोर येऊन माहिती दिली, की शाहरुख खानने दुआ पढल्यानंतर फुंकर मारली. ही पद्धत नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने  काश्मीरस्थित इस्लामिक तज्ज्ञ आसिफ इकबाल यांच्याशी संपर्क साधला. 

“कोणासाठी सुर अल-शिफा पढून दुआ केल्यानंतर फुंकर मारली जाते. व्हायरल व्हिडिओमध्येसुद्धा शाहरुख खान मंगेशकरांच्या आत्म्यास शांती लाभण्याची कामना करण्यासाठी दुआ करताना दिसतो,” असे त्यांनी सांगितले. 

ALSO READ: शाहरुख खानने खरंच पाकिस्तानला 44 करोड रुपये मदत केली नव्हती? वाचा सत्य

पश्चिम बंगालमधील अहले हदीस असोसिएशनचे सदस्य इमाम अमिनुद्दीन फैजी यांनी सांगितले, की मुस्लिम रितीरिवाजानुसार अल्लाहकडे कामना करण्याची ही एक पद्धत आहे. दिल्लीच्या जवानहरलाल नेहरू विद्यापीठातील इस्लामिक स्टडीजचे तज्ज्ञ झुबेर हुदावी यांनीसुद्धा व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले. शाहरुख खान सार्वजनिक कार्यक्रमात आणि तेदेखील सर्वांसमक्ष थुंकेल या गोष्टीवर कोणी कसा विश्वास ठेवू शकते? याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

जामिया मिलिया इस्लामिया महाविद्यालयतील इस्लामिक इतिहास विभागाचे प्रमुखे डॉ. इक्तिदार खान यांनी सांगितले, की “इस्लामिक परंपरेनुसार पार्थिवासमोर जी दुआ केली जाते तिला फातिहा म्हटले जाते आणि जिच्या शेवटी फुंकर मारून प्रार्थना स्वीकारली असे मानले जाते. मृतात्म्याच्या शांतीची कामना यात केली जाते. शाहरुख खाननेसुद्धा हेच केले आहे.”

Caption – लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकले नव्हते. त्याने दुआ मागितल्यानंतर त्याने पद्धतीनुसार फुंकर मारली होती. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकले नाही; त्याने दुआनंतर केवळ फुंकर मारली

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False