रविशंकर प्रसाद यांच्या भाषणादरम्यान अमित शहा यांना संसदेत डुलकी लागली होती का?

False राजकीय | Political

जनतेचे प्रतिनिधी म्हणून खासदारांनी संसदेतील प्रत्येक घडामोडीमध्ये सक्रीय सहभाग किंवा लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु, काही खासदार संसेदेच्या काहीशा रुक्ष आणि रटाळ प्रक्रियेला कंटाळून वामकुक्षी घेतानाचे अनेक फोटो आणि व्हिडियो समोर येत असतात. सध्या भाजपचे खासदार आणि गृहमंत्री अमित शहा यांचादेखील असाच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रविशंकर प्रसाद यांच्या भाषणादरम्यान शहा यांचा डोळा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

रविशंकर यांच्या राज्यसभेतील भाषणादरम्यानचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. यामध्ये बाजूला बसलेले अमित शहा यांच्या चेहऱ्याकडे लक्ष वेधत लिहिले की, राहुल गांधी संसदेत मोबाईलकडे पाहत होते हे सर्व मीडियावाले बोंबा मारुन 5-5 मिनिटाला दाखवत होते. परंतु, रविशंकर प्रसाद भाषण देत असताना बाजूला झोपलेले अमित शहा मीडियाला दिसले नाही का?

हाच फोटो वापरून एक युजरने उपरोधात्मकपणे लिहिले की, पंडीत रविशंकर यांच्या मंजुळ गायनानं तल्लीन झालेले निद्रिस्त अमित भाई.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील स्क्रीनशॉटचे व्यवस्थित निरीक्षण केल्यावर राज्यसभा टीव्हीचा लोगो दिसतो. कदाचित हा फोटो राज्यसभेतील भाषणाचा फोटो असू शकतो. तसेच, फोटोत रविशंकर प्रसाद बोलताना दिसतात. त्यामुळे गुगलवर Ravi Shankar Prasad Speech In Rajya Sabha असे सर्च केले. त्यातून सगळ्यात आधी राज्यसभा टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडियो समोर येतो. 9 जानेवारी 2019 रोजी अपलोड केलेल्या व्हिडियोतूनच पोस्टमधील स्क्रीनशॉट घेण्यात आलेला आहे. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

राज्यघटनेमध्ये 124वी घटनादुरुस्ती करण्याच्या विधेयक राज्यसभेत मांडण्यात आल्यावर त्यावर करण्यात आलेल्या चर्चेत रविशंकर यावेळी बोलत होते. लोकसत्ताच्या बातमीनुसार, 9 जानेवारी रोजी विधेयकाला मंजुर मिळाल्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दृर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. या विधेयकाच्या बाजूने 165 मते पडली तर 7 जणांनी विरोधात मते दिली. हे विधेयक 8 जानेवारीला लोकसभेत मंजूर झाले होते.

26 मिनिटांचा हा व्हिडियो व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येते की, अमित शहा खाली बघून काही तरी वाचत आहे. केवळ एक रँडम क्लिक केलेल्या फोटोत ते डोळे लावून झोपलेले दिसत असल्याचा भास होतो. परंतु, व्हिडियो पाहिल्यावर दिसते की, ते झोपलेले नसून खाली काही तरी वाचत आहेत. खाली दिलेल्या जीआयएफ इमेजमध्ये तुम्ही ते पाहू शकता. एक पिवळ्या रंगाचे पुस्तक टेबलावरून उचलून वाचत होते.

निष्कर्ष

सदरील फोटो जानेवारी (2019) महिन्यात राज्यसभेमध्ये रविशंकर प्रसाद यांनी केलेल्या भाषणाच्या व्हिडियोचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये अमित शहा झोपलेले नसून, खाली काही तरी वाचत आहेत. त्यामुळे संसदेत अमित शहा यांना डुलकी लागल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:रविशंकर प्रसाद यांच्या भाषणादरम्यान अमित शहा यांना संसदेत डुलकी लागली होती का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False