हा फोटो ‘चंद्रयान-2’च्या उड्डाणापूर्वी केलेल्या पूजेचा नाही. वाचा सत्य काय आहे

False सामाजिक

चंद्रयान-1 च्या यशस्वी चांद्र मोहिमेनंतर भारताने दुसरे यान चंद्रावर पाठवले आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन 22 जुलै रोजी चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले. आधी 15 जुलै रोजी चंद्रयान-2 झेपावणार होते. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र एका आठड्याच्या कालवधीतच त्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर भारत अशी किमया करणारा जगातला केवळ चौथा देश ठरेल.

दरम्यान, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो फिरवला जात आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, हा फोटो चंद्रयान-2 च्या उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या पूजेचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एक पुजारी क्षेपणास्त्रासमोर (मिसाईल) पूजा करताना दिसतो. कॅप्शनमध्ये म्हटले की, हे चित्र आहे आपलं. भारताचं चांद्रयान-२ च्या अंतराळातील प्रक्षेपणापूर्वीचं. आता जे कर्मकांडाला नावं ठेवतात त्यांनी ही वैज्ञानिकांच्या समूहाने केलेली पूजा बघावी.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोची सत्यता तपसाण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून सदरील फोटो चंद्रयान-2 मोहिमेचा नाही, हे स्पष्ट झाले.

न्यूयॉर्क टाईम्सच्या एका बातमीत हा फोटो वापरण्यात आला आहे. कॅप्शननुसार, हा फोटो अग्नी-5 नावाच्या क्षेपणास्त्राची 2013 साली घेण्यात आलेल्या चाचणीचा आहे. हा फोटो गेटी इमेजसकडून घेतल्याचे येथे नमूद करण्यात आले आहे.

हा धागा पकडून गेटी इमेजस या फोटो संस्थेच्या वेबसाईटवर शोध घेतला. पल्लव बागला यांनी 15 सप्टेंबर 2013 रोजी हा फोटो काढला होता. भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची यावेळी चाचणी घेण्यात आली होती. पाच हजार किमी दूरवर मारा करण्याची यामध्ये क्षमता आहे. चाचणीस्थळावरील विविध फोटो तुम्ही खाली इम्बेड केलेल्या लिंकवर पाहू शकता. (सौजन्य- गेटी इमेजस)

Embed from Getty Images

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रेस रिलीजनुसार, ओडिशा येथील व्हीलर्स बेटावरून 15 सप्टेंबर 2013 रोजी अग्नी-5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. स्वदेशी बनावटीचे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

मूळ प्रेस रिलीज येथे वाचा – DRDO

निष्कर्ष

क्षेपणास्त्रासमोर पूजा करण्याचा फोटो चंद्रयान-2च्या प्रक्षेपणापूर्वीचा नाही. हा फोटो 2013 साली घेण्यात आलेल्या अग्नी-5 मिसाईलच्या चाचणीपूर्वीचा आहे. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा असत्य ठरतो.

Avatar

Title:हा फोटो ‘चंद्रयान-2’च्या उड्डाणापूर्वी केलेल्या पूजेचा नाही. वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False