
मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अतिदीड शहाण्यांना हाच एक पर्याय, असे म्हणत अनेक जण ही पोस्ट शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ मुंबईतीलच आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यात एका द्दश्यात दुचाकी या MH 12 या सीरिजच्या असल्याचे दिसून आले. हा क्रमांक पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आहे. याखेरीज एका इमारतीवर सिटी हॉस्पीटल तर एका दुकानावर प्राईम केमिस्ट असे लिहिले असल्याचे दिसून आले.

त्यानंतर हे सिटी हॉस्पीटल कुठे आहे याचा शोध घेतल्यावर ते पुण्यातील महात्मा फुले रस्त्यावर जुन्या मोटार स्टॅण्ड चौकाजवळ असल्याचे दिसून आले.

त्यानंतर याबाबत खात्री करुन घेण्यासाठी प्राईम केमिस्टचे मालक मोहम्मद अली मेहतर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, भवानी पेठ हा कोरोनाचा हॉटस्पॉट असून हा व्हिडिओ इथलाच आहे. या व्हिडिओत दिसणारे औषधाचे दुकान माझे आहे. दोन-तीन दिवसापूर्वी अनेकांनी याप्रकारचे व्हिडिओ बनवले होते.
यावरुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ मुंबईतील नसून पुण्यातील आहे. बीबीसी मराठीने पुण्यात शीघ्र कृती दलाच्या तुकडया दाखल झाल्याचे दिलेले वृत्तही आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा असल्याचा या व्हिडिओबाबतचा दावा असत्य आहे. हा व्हिडिओ पुण्यातील आहे.

Title:मुंबईत निमलष्करी दल दाखल झाल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
