या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.

False सामाजिक

सुधारित नागरिकत्व विधेयकावरून देशभरात आंदोलने आणि प्रदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत. अशाच तापलेल्या वातावरणात एका वयोवृद्ध व्यक्तीला काही लोक बेदम मारत असलेला व्हिडियो चिथवणीखोर दावा करून शेयर केला जात आहे. दावा आहे की, “भारत माता की जय” म्हटले म्हणून या व्यक्तीला मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये गुलाबी रंगाचे कपडे घातलेला वयोवृद्ध व्यक्ती बाजारपेठेत रस्त्यावर उभे राहून “भारत मात की जय” अशी घोषणा देतो. त्यानंतर काही युवक त्याला हटकतात आणि तेथून जाण्यास सांगतात. त्यांचा वाद वाढल्यावर युवक शिवीगाळ करीत त्याला धक्काबुक्की करतात व तो व्यक्ती खाली पडतो. मग तो खिशातील दगड काढून एकावर भिरकावतो. यानंतर पाच-सहा जण मिळून लाथबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण करतात. नंतर एकजण काठीनेसुद्धा मारतो.

हा व्हिडियो शेयर करताना सोबत लिहिले की, “भारत माता की जय बोलणाऱ्या बुजुर्ग पंजाबी माणसाला मारताना भारतातले मुस्लिम युवक. आपल्याच भारतात राहून भारत माता की जय नाही म्हणायचं. मग हे भरत आहे की पाकिस्तान? सच्चे हिंदुस्थानी असाल तर पुढे शेयर कराल. लवकरात लवकर हे अटक झाले पायजे”

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. सदरील वयोवृद्ध व्यक्तीला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. 

सर्वप्रथम विविध कीवर्ड्स टाकून या व्हिडियोचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, गेल्या दोन महिन्यांपासून हा व्हिडियो विविध दाव्यांसह इंटरनेटवर फिरत आहे. त्यातून कळाले की, व्हिडियोतील मूळ घटना राजस्थानमधील भीलवाडा शहरात घडली होती.

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने या भीलवाडा येथील कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता कळाले की, ही घटना 15 ऑक्टोबर 2019 रोजी शहरातील आझाद चौक येथे घडली होती. या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव होतचंद सिंधी आहे. त्यांचे पुत्र सोनू जेठानी यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. प्रकरणी पोलिसांनी हेमू सिंधी, इलू सिंधी, भगवान सिंधी उर्फ मनोज, मंजूर शेख, आसिफ शेख, शेयब शेख, पोला शेख आदींना अटक केली होती.

पोलिसांनी माहिती दिली की, होतचंद सिंधी हे पंजाबी नसून, सिंधी आहेत. त्यांची मानसिक स्थितीदेखील अस्थिर आहे. घटनास्थळी ते इतर फेरीवाल्यांना शिवीगाळ व त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळत होते. या फेरीवाल्यांशी त्यांचा जुना वाद आहे. 15 ऑक्टोबरच्या सकाळी 11 वाजता होतचंद यांनी फेरीवाल्यांशी वाद घातला. यातूनच पाच-सहा फेरीवाल्यांनी त्यांना मारहाण केली. 

अर्काइव्ह

यावेळी आसपासच्या लोकांनी मारहाणीचा व्हिडियो तयार केल्यानंतर सोशल मीडियावर तो झपाट्याने पसरला. यासंदर्भात विविध दावे करण्यात येऊ लागले. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते मजिंदर एस सिरसा यांनी ट्विटकरून या घटनेची माहिती दिली होती. 

पोलिसांनी स्पष्ट सांगितले की, होतचंद यांना हिंदू-मुस्लिम वाद किंवा “भारत माता की जय” म्हटल्यामुळे मारहाण झाली नव्हती. तो केवळ आपसातील वाद होता. भावावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी होतचंद स्वतः सध्या कारागृहात आहेत. एवढेच नाही तर होतचंद यांना पत्नीच्या खुनाच्या आरोपातही अटक करण्यात आले होते.  हा व्हिडियो यापूर्वी बूम लाईव्ह आणि विश्वास न्यूज यांनी फॅक्ट-चेक केला होता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल व्हिडियोतील व्यक्तीला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण नव्हती झाली. राजस्थानमधील भीलवाडा येथील फेरीवाल्यांच्या आपसातील वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले होते. त्याचा हा व्हिडियो आहे. तसेच ज्येष्ठ व्यक्ती पंजाबी नसून, सिंधी आहे. आणि मारहाण करणारे सर्व मुस्लिम नसून त्यात सिंधीदेखील आहेत. सदरील व्हिडियोला धार्मिक रंग न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Avatar

Title:या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False