नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा भाजपचा नेता अनिल उपाध्याय नाही. वाचा सत्य

False राजकीय

अनिल उपाध्याय हे नाव गेल्या वर्षापासून खूप गाजत आहे. सोशल मीडियावर या नावाने कोणत्याही व्यक्तीचे व्हिडियो शेयर केले जातात. कधी त्याला भाजपचा आमदार म्हटले जाते, तर कधी काँग्रेसचा खासदार. कधी तृणमूलचा आमदार म्हटले जाते तर, कधी सपाचा नेता. अशा या अगम्य अनिल उपाध्यायच्या नावाने आणखी एक व्हिडियो व्हायरल होत आहे.

गोहत्या बंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडियो शेयर करून म्हटले जातेय की, पक्षाला घरचा आहेर देणारा हा व्यक्ती भाजपचा आमदार अनिल उपाध्याय आहे. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

तथ्य पडताळणी

सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती नरेंद्र मोदींवर टीका करीत, भारतातील प्रमुख कत्तलखाने आणि मांस निर्यातदार गैरमुस्लिम असल्याचे सांगतो. या व्हिडियोमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्यासह कमळाचे चिन्ह आहे. युजरने हा पोस्टमध्ये म्हटले की, भाजप पक्षातील अनिल उपाध्याय यांच्या कडुन, मोदी शाह आरएसएस अंधमक्तांना,घरचा अहेर..

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वी अनेक वेळा सिद्ध केले आहे की, अनिल उपाध्याय नावाचा काँग्रेस किंवा भाजपचा कोणताही आमदार किंवा खासदार नाही. अनिल उपाध्याय ही एक काल्पनिक व्यक्ती आहे, ज्याचे नाव विविध पक्षांशी जोडले जाते. त्यामुळे या व्हिडियोच्या सत्यतेबाबत शंका निर्माण होते.

व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स् रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, या व्यक्तीचे नाव सत्यजीत असून, ते कन्नड फिल्म इंस्ट्रीमधील अभिनेते आहेत.

यांडेक्समध्ये प्राप्त परिणामांमध्ये Satyajit Kannadiga नावाचे युट्यूब चॅनेल आढळले. त्यामध्ये 9 एप्रिल 2018 साली अपलोड केलेला एक व्हिडियो मिळाला. SATYAJIT KANNADA ACTOR ELECTION URDU SPEECH CONGRESS 2018 या नावाच्या या व्हिडियोच्या 6.08 मिनिटांपासून फेसबुक पोस्टमधील व्हायरल क्लिप घेतलेली आहे. या व्हिडियोमध्ये मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे चिन्ह आहे.

कोण आहे अभिनेते सत्यजीत?

कन्नड अभिनेते सत्यजीत यांचे खरे नाव सईद निझामुद्दीन आहे. त्यांनी आतापर्यंत 650 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. Satyajit Kannadiga युट्यूब चॅनेलवर सत्यजीत यांचे काँग्रेसचा प्रचार करणारे चार व्हिडियो उपलब्ध आहे. यावरून हे सिद्ध होते की, ते भाजपचे आमदार अनिल उपाध्याय नाहीत. 

दोन्ही व्हिडियोंची तुलना केल्यावर कळते की, मूळ व्हिडियोतील ग्राफिक्समध्ये फेरफार करून व्हायरल क्लिपमध्ये काँग्रेसच्या ऐवजी भाजपचे नेते आणि चिन्ह एडिट करण्यात आले आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा व्यक्ती भाजपचा आमदार अनिल उपाध्याय नाही. त्यांचे नाव कन्नड सिनेअभिनेता सत्यजीत आहे. दोन वर्षांपूर्वी गोहत्या बंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणारा हा व्हिडियो त्यांनी तयार केला होता. मूळ व्हिडियोमध्ये फेरफार करून चुकीच्या दाव्याने हा व्हिडियो शेयर केला जात आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा भाजपचा नेता अनिल उपाध्याय नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False