मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

Missing Context राजकीय | Political

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली. 

यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हे फोटो यंदाचे नसून, दोन वर्षांपूर्वीचे आहेत. चुकीच्या संदर्भासह ते पसरविले जात आहेत. 

काय आहे दावा?

घरात गुडघ्याइतक्या साचलेल्या पाण्यात उभे असलेल्या नवाब मलिक यांचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत त्यांना टोला मारताना युजर्सने म्हटले की, ‘माझ्या घरात पाणी याला “केंद्र सरकार” जबाबदार’.

मूळ पोस्टचा स्क्रीनशॉट. स्रोत – फेसबुकअर्काइव्ह

कोरोना परिस्थिती आणि लशीचे वाटप यावरून सध्या महाविकास आघाडी सरकर (राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस) आणि केंद्र सरकार (भाजप) यांच्यामध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला कोण जबाबदार यावरून राज्य व केंद्र एकमेकांना जबाबदार सांगत आहेत. 

या पार्श्वभूमीवर पहिल्याच पावसात राज्य सरकारच्या मंत्र्याच्या घरातच पाणी शिरल्यावरही केंद्रालाच जबाबदार धरणार का, असा खोचक प्रश्न व्हायरल पोस्टद्वारे उपस्थित केला जात आहे. 

मग खरंच नवाब मलिक यांच्या घरात यंदा पावसाचे पाणी साचले का?

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो कधीचा आहे, हे शोधले. रिव्हर्स इमेज केल्यावर लगेच कळाले की, हा फोटो यंदाच्या पावसाळ्यातील नाही. 

स्वतः नवाब मलिक यांनी 2 जुलै 2019 रोजी घरात पाणी साचल्याचे हे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. घरात साचलेल्या पाण्यात उभे राहून त्यांनी फोटो काढले होते. ट्विटमध्ये त्यांनी उपरोधकपणे बृहन्मुंबई महानगरपालिकेला ‘धन्यवाद’ म्हटले होते.

अर्काइव्ह

यासोबतच त्यांनी घरातील हॉलमध्ये, किचनमध्ये साचलेल्या पाण्याचेदेखील फोटा शेअर केले होते. तसेच मुंबई पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेना टोला लगावत त्यांनी ‘करुन दाखवले’ असेदेखील म्हटले होते.


READ: ‘कोविड’ मुळे मृत्यू झाल्यावर कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत मिळणार का?


नवाब मलिक यांच्या घरात पाणी शिरल्याची बातमी लोकसत्ता, सकाळ, टीव्ही-9 मराठी, नवभारत टाईम्स यासह अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केली होती.

अर्काइव्ह

मुंबईमध्ये 2 जुलै 2019 रोजी जोरदार पाऊस झाला होता. परिस्थिती एवढी गंभीर होती की,राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. तसेच मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, नवाब मलिक यांचा राष्ट्रवादी पक्ष जुलै 2019 मध्ये विरोधी पक्ष होता. राज्यात तेव्हा भाजप व शिवसेनेचे युती सरकार होते. ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र झाले. 


READ: WhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात आले का?


निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नवाब मलिक यांच्या घरात पावसाचे पाणी साचल्याचे व्हायरल फोटो दोन वर्षे जुने आहेत. ते 10 जून रोजी मुंबईत पडलेल्या पावसादरम्यानचे नाहीत. जुने फोटो चुकीच्या संदर्भासह यंदाचे म्हणून पसरविले जात आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Missing Context