हे अरुणाचल प्रदेशमधील पंचतारांकित इटानगर विमानतळ नाही; वाचा या व्हिडिओचे सत्य

False राजकीय | Political

एका आकर्षक बनावटीच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे सुरू होणारे नवे विमानतळ आहे. विशेष म्हणजे या विमानतळासाठी पारंपारिक बांबूचा वापर करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेश येथील विमानतळाचा नाही.

काय आहे दावा?

आकर्षक सजावट आणि सुंदर स्थापत्य असणाऱ्या इमारतीचा व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, “अरुणाचल प्रदेशचे हे विमानतळ मुख्यतः बांबू पासून बनवलेले, लवकरच आमचे पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. विश्वास बसत नाही. हे इथे भारतात आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर गेल्या महिन्यात हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला होता. 

कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी 18 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर करून म्हटले होते की, हे बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तयार होत असलेले टर्मिनल क्र. 2 आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे या विमानतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. 

कर्नाटकचे लघु व मध्यम औद्योगिक मंत्री डॉ. मुरुगेश निराणी आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलजे यांनीसुद्धा गेल्या महिन्यात हाचा व्हिडिओ बंगळुरु विमानतळाचा म्हणून शेअर केला होता. 

पत्रकार महेश चिटणीस यांनी बंगळुरु विमानतळाच्या टर्मिनल-2 चा वेगळा व्हिडिओ शेअर केला होता. 

लोकसत्ताच्या बातमीनुसार, बंगळुरू शहराची गार्डन सिटी ही ओळख दर्शवण्यासाठी या विमानतळाच्या टर्मिनलला गार्डनसारखा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

अमेरिकेतील स्किडमोर, ओविंग्ज अँड मेरिल कंपनीने या टर्मिनल डिझाईन केले असून प्रवाशांना बागेतून चालतानाचा अनुभव यावा अशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 नोव्हेंबर रोजी या टर्मिनल क्र. 2 चे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या टर्मिनलचे फोटो शेअर केले होते.

‘नवे टर्मिनल 2 बंगळुरू विमानतळाच्या क्षमतेत भर घालेल आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करेल. आपल्या शहरी केंद्रांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. टर्मिनल सुंदर आणि प्रवासी स्नेही  आहे! त्याचे उद्घाटन करून आनंद झाला,’ असे नरेंद्र मोदींनी ट्विट केले. 

अरुणाचल प्रदेशचे इटानगर विमानतळ

अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरच्या होलोंगी ग्रीनफिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने  या विमानतळाचे “डोनी पोलो विमानतळ, इटानगर” असे नामकरण करण्यास मंजुरी दिली. 

अरुणाचल प्रदेशच्या परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेले सूर्य (डोनी) आणि चंद्र (पोलो) यांच्यावरून हे नाव देण्यात आलेले आहे.  

विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी ग्रेट हॉर्नबिल पक्षाच्या आकाराप्रमाणे बांबूचे गेट तयार करण्यात आलेले आहे. ग्रेट हॉर्नबिल हा अरुणाचल प्रदेशचा राज्यपक्षी आहे. 

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील डोनी पोलो विमानतळाचा नाही. हा व्हिडिओ बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल क्र. 2 चा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:हे अरुणाचल प्रदेशमधील पंचतारांकित इटानगर विमानतळ नाही; वाचा या व्हिडिओचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False