दक्षिण कोरियातील फोटो केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारसभांनी जोर धरला आहे. नुकतेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची राजकोटमध्ये सभा झाली. यानंतर विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होऊ लागला असून त्यासोबत दावा केला जात आहे की, तो केजरीवाल यांच्या राजकोट येथील सभेला जमलेल्या गर्दीचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला असून हा फोटो राजकोटच नाही तर भारतातीलसुद्धा नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये रस्त्यावर विशाल गर्दी दिसते. सोबत लिहिले आहे की, “राजकोटमध्ये स्थानीक लोक मोठ्या संख्येने ‘आप’च्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.” 

 फेसबुक      

तथ्य पडताळणी 

फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो भारतातील नाही. 

द कोरिया टाइम्सनुसार हा फोटो दक्षिण कोरियाची राजधानी सियोल शहरातील आहे. सियोलमध्ये ‘हॅलोवीन’ उत्सवादरम्यान झालेल्या चेगराचेंगरीत 140 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सियोलमधील सिटी हॉलपाशी मोठ्या संख्येने लोक जमले होते. 

लोकसत्ताच्या बातमीनुसार, सियोलमधील इटावॉन लेजर भागात ‘हॅलोवीन’ उत्सवादरम्यान 31 ऑक्टोबर रोजी हॅमिल्टन हॉटेलजवळील एका अरुंद रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून यांनी राष्ट्रीय शोक कालावधीची घोषणा केली आहे.

चेंगराचेंगरीमध्ये मृत पावलेल्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. हे फोटो त्या शोकसभेचे आहेत. 

वरील माहितीच्या आधारे शोध घेतल्यावर गुगल मॅप्सवर फोटोतील जागा सापडली. सियोल शहरातील सिटी हॉल परिसरातील हा रस्ता आहे. 

खाली दिलेल्या स्ट्रीट व्ह्युवमध्ये आपण त्याच इमारती पाहू शकता ज्या व्हायरल फोटोमध्ये दिसतात.

अरविंद केजरीवाल यांची राजकोट रॅली

वेबदुनियाच्या बातमीनुसार 7 नोव्हेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांचा राजकोट येथे रोड शो अयोजित करण्यात आला होती. 

या रॅलीचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता. 

निष्कर्ष 

यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल फोटो दक्षिण कोरियाचा आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीला जमलेल्या गर्दीचा म्हणून चुकीच्या माहितीसह तो शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:दक्षिण कोरियातील फोटो केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False