
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेशी प्रदीर्घ सल्लामसलत करूनच नोटंबदीचा निर्णय घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आरबीआय माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे केंद्राला खोटे ठरवणारे एक कथित विधान व्हायरल होत आहे. यात रघुराम राजन कथितरीत्या म्हणतात की, नोटबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा मी गव्हर्नर होतो आणि आरबीआयला विचारात न घेताच केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, नोटबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नरच नव्हते.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह म्हटले आहे की, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, आरबीआयला विचारत घेऊनच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. सोबत आणि रघुराम राजन यांच्या फोटोसह विधान आहे की, “त्यावेळी मी आरबीआयचा गव्हर्नर होतो आणि केंद्राने आरबीआयला नोटबंदीविषयक कोणताही निर्णय घेण्याबाबत विचारले नव्हते.”
हे पोस्टर शेअर करून युजर दावा करत आहेत की, रघुराम राजन यांनी मोदी सरकारचा खोटारडेपणा समोर आणला.

तथ्य पडताळणी
केंद्र सरकारने 2016 साली केलेल्या नोटबंदीविरोधात दाखल 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरु आहे. याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे की, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार केंद्र सरकारला विशिष्ट सीरीजच्या चलनाची नोट रद्द करण्याचा अधिकार आहे; परंतु संपूर्ण चलन रद्द करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा सरसकट बाद करताना कोणत्या कायद्याचा आधार घेण्यात आला, असा सवाल याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे.
न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी घेतली जात आहे.
या खटल्यात केंद्र सरकारने 16 नोव्हेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली की, आरबीआयसोबत सविस्तर चर्चा करूनच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने 2016 साली फेब्रुवारी महिन्यापासूनच नोटबंदीविषयी आरबीआयशी चर्चा सुरू केली होती; परंतु, ही चर्चा आणि निर्णय प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली.

मग रघुराम राजन यांनी खरंच केंद्र सरकारला तोंडघशी पाडणारा खुलासा केला का?
रघुराम राजन यांनी सध्या सुरू असणाऱ्या न्यायालयीन सुनवाईदरम्यान कोणतेही विधान केल्याचे आढळले नाही.
विशेष म्हणजे, नोटबंदी जेव्हा जाहीर करण्यात आली (8 नोव्हेंबर 2016) तेव्हा राजन आरबीआयचे गव्हर्नरच नव्हते. राजन यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2016 रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. थोडक्यात काय तर, नोटबंदीचा निर्णय उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता.
रघुराम राजन यांनी त्यांची नोटबंदीविषयक भूमिका त्यांच्या ‘आय डू व्हॉट आय डू’ (2017) या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेली आहे. या पुस्तकात त्यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारने फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांना नोटबंदीचे फायदे व तोटे यांविषयी मत विचारले होते. राजन यांनी तोंडीच त्यांची भूमिका सरकारला सांगितली होती.
राजन यांच्या मते नोटबंदीमुळे नजीकच्या काळात होणारे आर्थिक नुकसान भविष्यात होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत अधिक असेल. त्यांनी नोटबंदीला पर्यायी उपाययोजनादेखील सुचविल्या होत्या. आरबीआयने मग केंद्र सरकारला यावर लिखित अहवालसुद्धा पाठवला. यावर केंद्राने एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या बैठकीला आरबीआयचे चलन विभागाचे उप-गव्हर्नर हजर राहायचे.
जसे की रघुराम राजन 4 सप्टेंबर 2016 रोजी गव्हर्नरपदावरून पायउतार झाले, त्यांनी लिहिले की, “माझ्या कार्यकाळात नोटबंदीविषयी कोणताही ठोस निर्णय घेण्याची विचारणा करण्यात आली नव्हती.”

उर्जित पटेल यांना कधी विचारण्यात आले?
नोटबंदी निर्णय जाहीर करण्याच्या फक्त अडीच तास आधी रिझर्व्ह बँकेचे तत्कालिन गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाची बैठक झाली होती. या मंडळाने नोटंबदीच्या निर्णयाला परवानगी देण्याआधीच पंतप्रधान मोदींनी ही निर्णय जाहीर केला. नोटबंदीच्या लागू होऊन 38 दिवस उलटून गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यांची मंजुरी पाठवली होती, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली होती.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, रघुराम राजन गव्हर्नर असताना केंद्र सरकारने त्यांना नोटबंदीविषयी मत विचारले होते. परंतु, नोटबंदी जाहीर झाली तेव्हा राजन आरबीआयचे गव्हर्नर नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात नोटबंदीविषयी निर्णय घेण्याचा प्रश्नच राहत नाही. नोटबंदीच्यावेळी उर्जित पटेल आरबीआय गव्हर्नर होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:RBI ला न विचारताच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, असे रघुराम राजन म्हणाले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
