भारताने चीनचे सैनिक मारले म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले का? वाचा सत्य

False राजकीय

भारतीय लष्कराने चीनचे सैनिक मारले म्हणून भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत रॅली काढून याचा विरोध केला, असा दावा केला जात आहे. यासोबत सीपीआयएम नेत्यांचे आंदोलनातील फोटो शेयर केले जात आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

सीपीआयएम नेत्यांचे हातात फलक घेऊन आंदोलन करतानाचे फोटो शेयर करून म्हटले की, “भारतीय लष्कराने चीनच्या 5 सैनिकांना उडवल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी दिल्लीत रॅली काढून घोषणाबाजी केली. मोठे दुर्दैव.” 

cpim-fb.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील फोटोंना रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो कम्युनिस्ट पक्षातर्फे 16 जून रोजी दिल्लीतील मुख्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनातील आहेत. ‘सीपीआयएम’ पक्षाच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरून ते शेयर करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या नागरिक-विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हाताली फलकावर गरीबांना 10 किलो रेशन देण्याची मागणी लिहिलेली आहे.

अर्काइव्ह 

केंद्र सरकार कोरोनाविषाणूच्या महासंसर्गाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मंदावलेल्या आर्थिक विकासाचा निषेध करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षातर्फे 16 जून रोजी देशव्यापी आंदोलन पुकरण्यात आले. देशातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षातर्फे सोशल डिस्टन्सिंग राखत मोर्चे व घोषणाबाजी करण्यात आली.

द हिंदु, न्यूजक्लिक, दैनिक भास्कर यासह देशातील सर्व मीडियाने या आंदोलनाविषयी बातम्या केल्या. त्यानुसार, लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्राप्ती करमर्यादेच्या बाहेरील लोकांना पुढील सहा महिन्यांसाठी दरमाह 7500 रुपये आणि दहा किलो मोफत रेशन द्यावे, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. 

दिल्ली येथील ‘सीपीआयएम’ मुख्यालयामसोरील आंदोलनात सरचिटणीस सीताराम येचुरी, पोलिट ब्युरोचे सदस्य वृंदा करात, प्रकाश करात, तपन सेन आदी उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेले फेसबुक लाईव्ह तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

विशेष म्हणजे या आंदोलनाची घोषणा 2 जून रोजी झालेल्या पॉलिट ब्युरो बैठकीतच करण्यात आली होती. कम्युनिस्ट पक्षाने व्हिडियो कान्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीतील मुद्दे व ठराव पक्षाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले होते. मीडियानेदेखील यासंबंधी बातम्या दिल्या होत्या.

Mint-1.png

मूळ बातमी येथे पाहा – लाईव्ह मिंट 

भारत-चीन संघर्षाविषयी ‘सीपीआयएम’ने 16 जून रोजी पत्रक काढून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सीमेवरील तणावाविषयी चिंता व्यक्त करीत कम्युनिस्ट पक्षाने भारत सरकारने संघार्षाबाबात त्वरित अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच चीन व भारताने चर्चा करून तोडगा काढावा असेही यामध्ये म्हटले आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, 16 जून रोजी कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आलेले आंदोलन पूर्वनिश्चित होते. तसेच आंदोलनाचा हेतू केंद्र सरकारकडे गरीबांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्याचा होता. चीनचे सैनिक मारले म्हणून हे आंदोलन करण्यात आले नव्हते. चुकीच्या दाव्यासह आंदोलनातील फोटो व्हायरल होत आहे.

Avatar

Title:भारताने चीनेचे सैनिक मारले म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False