नारळ पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होतो का? टाटा हॉस्पिटलच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

False आरोग्य

सोशल मीडियावर आरोग्यविषयी सल्ला देणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट असतो. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचा दाखला देत सल्ला दिला आहे की, नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे आवाहनही यामध्ये केलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलने या मेसेजचे खंडन केले आहे. 

काय आहे दावा?

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. राजेंद्र ए. बडवे यांच्या नावाने सांगितले की, “गरम नारळ केवळ कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. ग्लासामध्ये ४ ते ५ नारळाचे तुकडे बारीक चिरून /कापून घ्या, त्यात अर्धा ग्लास गरम पाणी घाला, ते “क्षारीय पाणी” होईल, दररोज प्या, ते कोणा साठीही चांगले आहे. गरम नारळाचे पाणी कर्करोगाविरोधी असून जे वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या प्रभावी उपचारांसाठी नवीनतम प्रगती म्हणून पुढे आले आहे. गरम नारळाचा हा  रस अल्सर आणि ट्यूमरवर परिणाम करतो.  सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपाय करण्यासाठी सिद्ध.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

डॉ. राजेंद्र बडवे हे मुंबईच्या परळ येथील टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक आहे. त्यांनी खरंच असा काही सल्ला दिला याचा शोध घेतला. तेव्हा कळाले की, सदरली मेसेज दोन वर्षांपूर्वीदेखील त्यांच्या नावे व्हायरल झाला होता. तेव्हा टाटा मेमोरियल सेंटरतर्फे त्याचे खंडन करण्यात आले होते. 

टाटा मेमोरियल सेंटरतर्फे 16 मे 2019 रोजी या मेसेजसंदर्भात खुलास प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात सेंटरतर्फे या मेसेजमधील माहिती अशास्त्रीय असल्याचे सांगितले. तसेच डॉ. राजेंद्र बडवे यांनी अशा प्रकारचा सल्ला दिलेला नसून, त्यांच्या नावे असत्य माहिती पसरविली जात असल्याचे, खुलाशात म्हटले आहे. 

“नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोग बरा होतो किंवा कॅन्सर पेशी नष्ट होतात, या विधानाला शास्त्रीय आधार नाही. यासंदर्भात कोणताही ठोस पुराव अद्याप उपलब्ध नाही. लोकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये,” असे डॉ. बडवे यांनी खुलाशात म्हटले आहे. 

मूळ स्रोतः टाईम्स ऑफ इंडिया | एशियन एज

हाच मेसेज दक्षिण आफ्रिकेत तेथील डॉक्टरच्या नावानेसुद्धा व्हायरल झाला होता. या मेसेजमधील दाव्यांचे खंडन करताना तेथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अटारा तेकिम यांनी आफ्रिका चेकशी बोलतना सांगितले होते की, कॅन्सरवर कायमचा ईलाज शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत. विविध पदार्थांवर याविषयी संशोधन सुरू आहे. नारळसुद्धा त्यापैकी एक आहे. अद्याप झालेल्या संशोधनामध्ये केवळ प्रयोगशाळेतील मर्यादित परिस्थितीमध्ये नारळाचे तेल सकारात्मक परिणाम करीत असल्याचे समोर आले आहे. परंतु, याविषयी अधिक सखोल संशोधन होणे गरजेचे आहे.

इतरही काही संशोधनामध्ये नारळाच्या पाण्यात कर्करोगरोधी गुणधर्म असल्याचे दिसून आले आहेत. परंतु, हे सर्व संशोधन खूपच प्राथमिक टप्प्यातील आहे. त्यावरून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही.

आरोग्यविषयक माहितीची पडताळणी करणाऱ्या ‘द हेल्थी इंडियन प्रोजेक्टशी’ बोलताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. मनीष सिंघल यांनी माहिती दिली की, “नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, याबाबत काही दुमत नाही. परंतु, ते गरम करून पिल्यानंतर सर्व प्रकारचे कॅन्सर बरे होतील असे म्हणने चुकीचे आणि धोकादायक आहे. अशा मेसेजमुळे रुग्ण वैद्यकीय उपचारांना टाळून अशास्त्रीय गोष्टींकडे वळण्याचा धोका असतो.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे फेक मेसेज व्हायरल होत आहे. नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होतो, असे त्यांनी म्हटलेले नाही. वाचकांनी अशा खोट्या व दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नारळ पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होतो का? टाटा हॉस्पिटलच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False