हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा म्हणून FAKE व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह जाळून हत्या करण्यात आली. आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय देण्याची संपूर्ण देशातून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पीडितेच्या अंतिम संस्काराचा व्हिडियो म्हणून एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची सत्य पडताळणी केली.

हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकयुट्यूब

तथ्य पडताळणी

गुगलवर हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराविषयी शोधले असता वरीलप्रमाणे एकही व्हिडियो आढळला नाही. हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकावर चार जणांनी दुचाकी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने 27 नोव्हेंबर रोजी बलात्कार केला होता. नंतर त्यांनी तिची हत्या करून शव जाळले. 28 नोव्हेंबर रोजी एका पुलाखाली हे जळालेले शव आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.

ई-टीव्ही आंध्र प्रदेश या प्रतिष्ठित स्थानिक वृत्तवाहिनीच्या 28 नोव्हेंबरच्या बातमीनुसार, पीडितेवर हैदराबादमधील पुराणा पूल स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले होते. खाली दिलेल्या व्हिडियोमध्ये तुम्ही पीडेतेच्या अंतिम संस्काराच्या वेळीची दृश्ये पाहू शकता.

दोन्ही व्हिडियोची तुलना केल्यावर हे स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडियो हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा नाही. साक्षी समाचार वेबसाईटवर पीडतेच्या अंतिम संस्काराचा फोटो देण्यात आला आहे. पोस्ट मॉर्टमनंतर पीडितेचे शव कुटुंबाकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर पुराना पुल स्मशानभूमित अंतिम संस्कार करण्यात आले.

मूळ बातमी येथे वाचा – साक्षी समाचार

फॅक्ट क्रेसेंडोने मग हैदराबाद येथील पुराना पुल स्मशानभूमि व्यवस्थापनाशी संपर्क केला. त्यांनी ईटीव्ही आंध्र प्रदेश चॅनेलचा व्हिडियोच पीडितेच्या अंतिम संस्काराचा असल्याचे सांगितले. तसेच व्हायरल व्हिडियो खरा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सदरील व्हायरल व्हिडियो एखाद्या वाळवंटातील असल्याचे वरकरणी दिसते. तो नेमका कुठला आहे, हे अद्याप निश्चित नाही. मात्र तो हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा नाही हे स्पष्ट आहे.

निष्कर्ष

हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा म्हणून एक असंबंधित व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत पीडितेच्या अंतिम संस्काराचा खरा व्हिडियो समोर आला असून, व्हायरल होत असलेला व्हिडियो असत्य आहे.

Avatar

Title:हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंतिम संस्काराचा म्हणून FAKE व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False