
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार व नंतर तिचा मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली. संपूर्ण देशात या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटत असून, आरोपींनी त्वरीत शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर पोलीस एका व्यक्तीला काठीखाली मारत असल्याचा व्हिडियो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात येतोय की, हा व्यक्ती हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोहम्मद पाशा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे समोर आले. हा व्हिडियो आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील एका वेगळ्या आरोपीचा आहे.
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
काय आहे व्हिडियोमध्ये?
व्हिडियोमध्ये पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला काठीखाली मारत आहेत. व्हिडियोमध्ये तेलुगु भाषा बोलत असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या तेलुगु भाषिक सहकाऱ्यांनी सांगितले. हा व्हिडियो नेमका कुठला आहे याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून लिओ टीव्ही नावाच्या युट्यूब अकाउंटवरील एक व्हिडियो समोर आला. त्यानुसार हा व्हिडियो किलिकिरी येथे दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडल्याचा आहे. हा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.
हा धागा पकडून शोध घेतला असता द हिंदू आणि द हंस इंडियाची बातमी आढळली. त्यानुसार, चित्तूर जिल्ह्यातील किलिकिरी येथे एका दहा वर्षीय मुलीवर एका 25 वर्षीय तरुणाने 24 नोव्हेंबर रोजी बलात्कार केल्याची घटना घडली होती. आरोपीने मुलीचा गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला होता. या आरोपीला आधी गावकऱ्यांनी पकडून चोप दिला आणि मग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने पोलिसांच्या ताब्यातून दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याची अशी काठीखाली धुलाई केली होती.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदू । अर्काइव्ह
आजतकनेसुद्धा 28 नोव्हेंबर रोजी “रेप के आरोपी की पिटाई का VIDEO, नाबालिग बच्ची से की थी दरिंदगी व्हायरल” या मथळ्याखाली सदरील घटनेचा व्हिडियो शेयर केला होता.
फॅक्ट क्रेसेंडोने किलिकिरी पोलिस ठाण्याचे एसएचओ राम्मांज नैलू यांच्याशी संपर्क साधला. सदरील व्हिडियो पाहून त्यांनी हा व्हिडियो किलिकिरी येथील असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “हा व्हिडियो 24 नोव्हेंबर रोजीचा असून, एका दहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सदरील आरोपीला पकडण्यात आले होते. हा व्हडियो त्याचाच आहे. या व्हिडियोचा हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार प्रकारणाशी काही संबंध नाही”
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, सदरील व्हायरल व्हिडियो हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा नाही. हा व्हिडियो आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यातील एका वेगळ्या प्रकरणातील आरोपीचा आहे. त्यामुळे चुकीच्या दाव्यासह हा व्हिडियो पसरविला जात आहे.

Title:हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चित्तूर येथील व्हिडियो व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
