
अगर हमारी सरकार गीरी तो पुरे देश में आग लगा दुंगा, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
योगी आदित्यनाथ यांचा हे छायाचित्र आम्ही गुगल रिव्हर्स सर्च इमेजद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कोणताही रिझल्ट मिळाला नाही. हा फोटो क्रॉप केल्यावर आम्हाला काही निकाल दिसून आले. यातील एका वृत्तात त्यांनी राजकीय वक्तव्य केल्याचे दिसून आले. त्या राजकीय वक्तव्यातही त्यांनी अगर हमारी सरकार गीरी तो पुरे देश में आग लगा दुंगा असे कुठेही म्हटलेले नाही. expressnews7.com या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.


योगी आदित्यनाथ याच्याबाबतचे हे वृत्त दाखवत असलेल्या पोस्टमध्ये खाली गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. चॅनलचा लोगो तपासला असता तो मंतव्य न्यूज या गुजराती वृत्तवाहिनीचा असल्याचे दिसून आले. त्यांच्या mantavyanews.com या संकेतस्थळावर गेलो असता त्यावर सर्व बातम्या गुजराती भाषेत असल्याचे दिसून येते. या चॅनलच्या लाईव्ह फिडमध्ये केवळ गुजराती भाषेचाच वापर केल्याचे दिसून येते. आम्ही याबाबत या चॅनलचे संपादक दीपक रजनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण अशा प्रकारचे कोणतेही वृत्त दिले नव्हते, असे स्पष्ट केले. अशा प्रकारे फोटोशॉप करुन चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत असल्याचे आपल्या लक्षात आले असल्याचे त्यांनी सांगितले. अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी असे वक्तव्य केले का? हे शोधत असताना योगी आदित्यनाथ यांनी 2017 पूर्वी केलेल्या विविध वादग्रस्त वक्तव्यांचे एक वृत्त आम्हाला बीबीसीवर दिसून आले. यात त्यांनी विविध विषयांवर केलेली वादग्रस्त वक्तव्ये समाविष्ट आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाऊंटवर आम्हाला याबाबत कोणतेही ट्विट आढळून आले नाही. फेसबुक अकाऊंटवरही याबाबत कोणतीही पोस्ट आढळली नाही. यूटयूबवरही आम्हाला त्यांनी असे वक्तव्य केल्याचा असा कोणताही व्हिडिओ आढळून आला नाही.
निष्कर्ष
योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केल्याचे आढळून येत नाही. ही पोस्ट ज्या वृत्तवाहिनीच्या नावाने चालविण्यात येत आहे ती वृत्तवाहिनी हिंदी नसून गुजराती आहे. ही पोस्ट फोटोशॉप असल्याचेही स्पष्ट होत आहे. या वृत्तवाहिनीच्या संपादकांनीही आपण असे कोणतेही वृत्त दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. विविध ठिकाणी पडताळणी केली असताही असे कोणतेही वृत्त दिसून येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : योगी आदित्यनाथ म्हणाले का, आमचे सरकार कोसळल्यास देशभरात आग लावू
Fact Check By: Dattatray GholapResult: False
