
सोशल मीडियावर सोनिया गांधी यांच्या संपत्तीविषयी गेल्या अनेक वर्षांपासून केला जात असलेला दावा पुन्हा केला जात आहे. यानुसार, काँग्रेसच्या काळात सोनिया गांधी जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला बनला होत्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये पुरावा म्हणून बिझनेस इनसायडर या वेबसाईटवरील एका आर्टिकल दिला आहे. 2 मार्च 2012 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या लेखाचे शीर्षक – Meet The 23 Richest Politicians In The World – असे आहे. जगातील सर्वात श्रीमंत 23 राजकीय नेत्यांची नावे लेखात दिली आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचा चौथा क्रमांक आहे. लेखानुसार, सोनिया गांधी यांची संपत्ती 2 ते 19 बिलियन डॉलर्स एवढी आहे. बिझनेस इनसायडरच्या लेखातच म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या संपत्तीचा आकडा विवादित आहे.

मूळ आर्टिकल येथे वाचा – बिझनेस इनसाईडर । अर्काइव्ह
लेखामध्ये ही माहिती वर्ल्डस् लक्झरी गाईड या वेबसाईटवरून घेतल्याचे लेखात नमूद केलेले आहे. परंतु, या वेबसाईटवरील मूळ आर्टिकल डिलीट करण्या आला आहे. मग आम्ही त्या आर्टिकलचे अर्काइव्ह व्हर्जन शोधले. त्यामध्ये – जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेते – या यादीत सोनिया गांधी यांना चौथ्या क्रमांकावर दाखवण्यात आलेले आहे.

मूळ लेखाचे अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा – वर्ल्डस् लक्झरी गाईड
फोर्ब्स या मॅगझिनतर्फे जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. फोर्ब्सच्या 2014 साली जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सोनिया गांधी यांचे नाव नाही. फोर्ब्सने 2013 साली प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात शक्तीशाली लोकांच्या यादीत सोनिया गांधीचा 21 क्रमांक होता तर, शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांचा नववा क्रमांक होता. म्हणजे फोर्ब्सनुसार, सोनिया गांधी यांचा श्रीमंत महिलांमध्ये समावेश नव्हता.

मूळ माहिती येथे वाचा – फोर्ब्स । अर्काइव्ह
हफिंग्टन पोस्ट या वेबसाईटनेदेखील 29 नोव्हेंबर 2013 रोजी – The Richest World Leaders Are Even Richer Than You Thought – शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. यामध्येदेखील सोनिया गांधी यांचा 12 वा क्रमांक होता. परंतु, नंतर त्यांनी या यादीतून सोनिया गांधी यांचे नाव वगळले. तशी लेखात सूचनादेखील दिली आहे. एका वेबासाईटवरील आकडेवारीवरून सोनिया गांधीचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्या वेबसाईटवरील माहितीच्या सत्यतेविषयी प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांचे नाव वगळण्यात आले.

देशामध्ये काँग्रेसची 2004 ते 2014 दरम्यान सत्ता होती.
सोनिया गांधी यांनी 2009 साली अमेठी येथून लोकसभेची उमेदवारी दाखल करताना भरलेल्या अॅफिडेविटनुसार त्यांची संपत्ती 1.37 कोटी रुपये एवढी होती. (टाईम्स ऑफ इंडिया)
अमेठी येथूनच 2014 साली उमेदवारी भरताना त्यांनी संपत्ती 9.28 कोटी रुपये जाहीर केली होती. (अॅफिडेविट 2014)
2019 लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांनी 11.81 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले. (अॅफिडेविट 2019)
निष्कर्ष
बिझनेस इनसाईडरने ज्या वर्ल्डस् लक्झरी गाईडवरून ही यादी तयारी केली होती, त्या वेबसाईटनेच ती यादी डिलीट केली आहे. तसेच फोर्बच्या सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीतही सोनिया गांधी यांचे नाव नाही. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची संपत्ती 1.37 कोटी (2009), 9.28 कोटी (2014) आणि 11.81 (2019) एवढी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काळात सोनिया गांधी जगातील चौथ्या श्रीमंत महिला असल्याचा दावा खोटा आहे.
(हा दावा यापूर्वी इंडिया टुडे, ऑल्ट न्यूज, बूम लाईव्ह यांनीदेखील खोटा ठरवलेला आहे.)

Title:काँग्रेसच्या काळात सोनिया गांधी खरंच जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिल्या होत्या का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
