हा फोटो दिल्लीतील शेतकरी मोर्चाचा नाही; तो 2018 मधील मुंबईतील किसान मोर्चाचा आहे

False राजकीय | Political

राजधानी दिल्लीच्या बाहेर हजारो शेतकरी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या मोर्चाच्या नावाखाली काही जुन्या आंदोलनांचेसुद्धा फोटो शेयर होऊ लागले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी असाच एक प्रचंड गर्दीचा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, तो फोटो 2018 मुंबईतील किसान मोर्चाचा आहे.

काय आहे दावा?

रस्त्यावर हजारो लोक बसल्याचा फोटो शेयर करून म्हटले की, “भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर ९६ हजार ट्रॅक्टर्स आणि १ कोटी २0 लाख शेतकरी मोर्चा घेऊन निघाले आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन 11 मे 2018 रोजी हा फोटो ट्विट केल्याचे आढळले. सोबत म्हटले की, मार्क्सवादी भारतीय कम्यूनिस्ट पक्षातर्फे (सीपीआयएम) आयोजित किसान मोर्चामध्ये मुंबईला जाण्यासाठी शेतकरी जमले.

अर्काइव्ह

ट्विटमधील फोटोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर ‘मुंबई लाईव्ह’ असा वॉटरमार्क दिसतो. त्यानुसार शोध घेतला असता, ‘मुंबई लाईव्ह’ नामक मुंबईविषयक बातम्या देणारी वेबसाईट आढळली. 

‘मुंबई लाईव्ह’च्या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो 10 मे 2018 रोजी शेयर करण्यात आला होता. सोबत माहिती दिली होती की, शेतीविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी सुमारे 25 हजार शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. हा फोटो ठाणे येथील विवियाना मॉलच्या समोरील ईस्टर्न एक्सप्रेस हायव्हेवरचा आहे.

काय होता हा मोर्चा?

‘लोकसत्ता’च्या बातमीनुसार, अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा 12 मार्च रोजी विधान भवनावर धडकला होता. नाशिकहून पायी-पायी निघालेल्या ‘किसान मोर्चा’त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातले शेतकरी सहभागी झाले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, 2018 मधील मुंबईच्या किसान मोर्चाच्या गर्दीचा फोटो सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून शेयर केला जात आहे.

Avatar

Title:हा फोटो दिल्लीतील शेतकरी मोर्चाचा नाही; तो 2018 मधील मुंबईतील किसान मोर्चाचा आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False