हा फोटो हिंदी व प्रशांत महासागराच्या संगमाचा नाही. तो अमेरिकेतील नदी-समुद्र मिलनाचा आहे

False आंतरराष्ट्रीय | International

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आजही निसर्गची किमया पाहून आपण स्तिमित होतो. असाच एक आश्चर्यकारक फोटो सोशल मीडियावर युजर्सना भुरळ घालत आहे. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या मिलनाचा हा कथित फोटो आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, या दोन विशाल महासागरांचे पाणी एकत्र आले तरी एकमेकांत मिसळत नाही. फोटोमध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाचे पाणी दिसते. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये शेयर केलेल्या फोटोमध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाचे पाणी दिसते. दाव्यानुसार, हा फोटो प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर जेथे एकत्र येतात तेथील आहे. त्यावर लिहिले की, प्रशांत महासागर और हिंद महासागर आपस में मिलते जरुर है मगर कभी मिक्स नहीं होते.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. रिझल्ट पेज क्रमांक दोनवर युट्यूबवरील एक व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. मर्लिन मॅगझीनने 13 नोव्हेंबर 2015 रोजी हा व्हिडियो अपलोड केला होता. पोस्टमधील फोटो याच व्हिडियोतून घेतलेला आहे, हे स्पष्ट दिसते. “Mississippi River Rip in the Flesh” नावाचा हा व्हिडियो अमेरिकेतील मिसिसिपी नदी जेथे मेक्सिकोच्या खाडीला (गल्फ ऑफ मेक्सिको) जेथे भेटते तेथील आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब (3,730 किमी) असणारी मिसिसिपी नदी मिनेसोटा राज्यात उगम पाऊन लुझियाना राज्यातून मेक्सिकोच्या खाडीत जाऊन मिळते.

यासंबंधी अधिक शोध घेतल्यावर अझुला नावाच्या वेबसाईटवरील 19 मे 2016 रोजीचा एक लेख मिळाला. यामधील माहितीनुसार मिसिसिपी नदी जेथे मेक्सिकोच्या खाडीला जाऊन मिळते तेथील हा फोटो/व्हिडियो आहे. निळे आणि हिरवे पाणी वेगवेगळे दिसते याचा अर्थ ते मिसळत नाही असा होत नाही. हा फोटो “डेड झोन”चा आहे. “डेड झोन” हा काही नैसर्गिक चमत्कार नसून, मानवामुळे तो तयार होतो.

मूळ लेख येथे वाचा – अझुलाअर्काइव्ह

रंग भिन्नतेचे कारण काय?

नॅशनल जिओग्राफिक आणि मायक्रोबायल लाईफ वेबसाईटवरील माहितीनुसार, समुद्र आणि तलावातील कमी ऑक्सिजन (Hypoxic) असलेली जागा म्हणजे डेड झोन. पाण्यात जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त फॉस्फरस आणि नायट्रोजनसारखे न्युट्रिएन्ट्स (पोषकतत्वे) जमा होतात, तेव्हा फायटोप्लँकटॉन (Phytoplankton) आणि झूप्लँक्टॉन (Zooplankton) यांची पाण्याच्या तळाशी वाढ होऊन तेथील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होते. त्यामुळे त्याला डेड झोन म्हणतात.

मिसिसीपी नदीमध्ये मोठ्याप्रमाणात शेतीसाठी वापरण्यात येणारी रासायनिक खतं आणि शहरी सांडपाण्याचा निचरा होतो. मग हे प्रदुषित झालेले पाणी गल्फ ऑप मेक्सिकोला जेव्हा मिळते तेव्हा तेथे डेड झोन तयार होतो. मानव कारणीभूत असलेल्या प्रदुषणामुळे हे नदी-सागराच्या मिलनाजवळील पाणी असे दुहेरी रंगाचे दिसते. वरकरणी जरी ते वेगवेगळे दिसत असले तरी पाणी मिसळते आणि त्यामुळे दरवर्षी सागरीजीवांचा मृत्यू होतो.

मिसिसिपी नदी मेक्सिकोच्या खाडीला जेथे मिळते त्या भागाला मिसिसिपी रिव्हर डेल्टा असे म्हणतात. वर एम्बेड केलेल्या गुगल मॅपमध्ये तुम्ही ते पाहू शकता. तेथेच हा डेड झोन तयार होता. दरवर्षी उन्हाळ्यात तो तयार होतो. त्यामुळे असे वेगवेगळ्या रंगाचे पाणी त्याच काळात दिसते. इतरवेळी ते सारख्याच रंगाचे असते. या वर्षी तयार होणारा डेड झोन आकाराने आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासंबंधीचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

पोस्टमध्ये दिलेला फोटो हिंदी आणि प्रशांत महासागराच्या मिलनाचा नाही. तो अमेरिकेतील मिसिसिपी नदी जेथे मेक्सिकोच्या खाडीला जाऊन मिळते तेथील आहे. डेड झोनमुळे तेथे पाण्याचा रंग भिन्न दिसतो. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:हा फोटो हिंदी व प्रशांत महासागराच्या संगमाचा नाही. तो अमेरिकेतील नदी-समुद्र मिलनाचा आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False