या पाकिस्तानी महिला पत्रकाराने वाजपेयींना काश्मीर मागितले नव्हते. जाणून घ्या सत्य

False आंतरराष्ट्रीय

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी एक मजेशीर पोस्ट फिरत आहे. त्यांच्या हजरजबाबीपणाची चुणूक दाखवणाऱ्या या पोस्टमध्ये सांगण्यात येते की, अटल बिहारी वाजपेयी यांना एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने लग्न करण्याचा प्रस्ताव देत काश्मीर पाकिस्तानला देण्याची अट घातली. अटलजींनी लगेच सडेतोड उत्तर दिले की, ठीक आहे पण हुंड्यात मला संपूर्ण पाकिस्तान द्यावे लागेल. पोस्टमध्ये त्या कथित पाकिस्तानी पत्रकाराचा फोटोसुद्धा दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानी महिला पत्रकाराचा फोटो दिला आहे. सोबत लिहिले की, अटलजी म्हणजे असाधारण व्यक्ती होते. या पाकिस्तानी महिलेने त्यांना म्हटले की, तुम्ही जर सुनमुख पाहण्यासाठी (मुंह दिखाई) काश्मीर दिले तर मी तुमच्याशी लग्न करेल. हजरजबाबी अटलजींनी उत्तर दिले की, ठीक आहे. परंतु, हुंड्यामध्ये मला संपूर्ण पाकिस्तान द्यावे लागेल. त्यांचे हे उत्तर ऐकुन सगळा पाकिस्तान दंग झाला. ही पोस्ट पाकिस्तानपर्यंत पोहोचली पाहिजे.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये या पाकिस्तानी महिला पत्रकाराचे नाव आणि हा किस्सा कधी घडला याची माहिती दिलेली नाही. सर्वप्रथम या महिला पत्रकाराचा फोटो यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यातून हा फोटो पाकिस्तानातील पहिली महिला शीख पत्रकार मनमीत कौर हिचा आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात मनमीतने पाकिस्तानातील ‘हम न्यूज’ नावाच्या वृत्तवाहिनीमध्ये काम करण्यास सुरवात केली होती.

अर्काइव्ह

पाकिस्तानातील महिला व अल्पसंख्याकांची परिस्थिती लक्षात घेता मनमीतच्या या धाडसी निर्णयाचे जगभरात कौतुक करण्यात आले. भारतातसुद्धा अनेक प्रतिष्ठित दैनिक व मीडिया वेबसाईट्सवर तिची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीनुसार पेशावरस्थित 24 वर्षीय मनमीतला आधी मॉडेल होण्याची इच्छा होती. परंतु, पत्रकार होऊन शीख समुदायाचे प्रश्न आणि समस्या समाजासमोर आणण्याचा तिने निर्णय घेतला. काकांच्या प्रोत्साहनामुळे तिने गेल्यावर्षी मे महिन्यात हम न्यूज वाहिनीमध्ये नोकरी सुरू केली. क्विंटने घेतलेली तिची मुलाखत येथे पाहू शकता

पोस्टमधील फोटो आणि मनमीत कौर यांचा मूळ फोटो यांची तुलना केल्यावर हे पूर्णतः स्पष्ट होते की, पोस्टमधील फोटो मनमीत कौर यांचाच आहे. त्यांनी मे, 2018 मध्ये पत्रकार म्हणून काम सुरू केले. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे वयाच्या 84 वर्षी 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. उतारवयात त्यांची तब्येत अतिशय खालावली होती. त्यांना 2009 साली आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर सार्वजनिक जीवनापासून ते दूर होते. त्यांना बोलता देखील येत नव्हते. त्यांचा शेवटचा फोटो 2015 साली सार्वजनिक करण्यात आला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते त्यांच्या घरी अटल बिहारींना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांना एखाद्या तरुण महिला पत्रकाराने लग्नाविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता नाही. तसे काही घडल्याचे कोणतेही वृत्त नाही.

मग अटलजींना पूर्वी कधी अशी मागणी करण्यात आली होती का?

गुगलवर याचा शोध घेतल्यावर कोणत्याही प्रतिष्ठित व प्रमाणित वेबसाईटवर पाकिस्तानी महिला पत्रकाराने अटलजींना सुनमुखात काश्मीरची मागणी केल्याचे वृत्त आढळत नाही. परंतु, लाईव्ह हलचल, रुमर्स टाईम्स, न्यूज क्लब अशा अप्रमाणित वेबसाईटवर मनमीत कौर यांचाच फोटो वापरून पोस्टमध्ये दिलेला किस्सा दिलेला आहे. त्यानुसार, 1999 साली अटलजींनी पंतप्रधान असताना अमृतसर-लाहोर बससेवा सुरू केली होती. त्यानिमित्त ते पाकिस्तानात गेले होते. तेथील गव्हर्नर हाऊसमध्ये त्यांनी भाषण केले. त्यावेळी एका महिला पत्रकाराने अटलजींना कोंडीत पकडण्यासाठी त्यांना सुनमुख पाहण्यासाठी काश्मीर देण्याची मागणी केली. त्यावर अटलजींना त्यांना हुंड्यात पाकिस्तान देण्याचे सडेतोड उत्तर दिल्याचे या वेबसाईटवरील लेखात म्हटले आहे. हा किस्सा घडला की, नाही याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तसेच, 1999 साली मनमीत कौर केवळ 5 वर्षांच्या होत्या. मग लेखात त्यांचा फोटो छापण्याचे प्रयोजन काय?

निष्कर्ष

अटल बिहारी वाजपेयी यांना पाकिस्तानी महिला पत्रकाराने सुनमुखात काश्मीरची मागणी केल्याचा किस्सा घडल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तसेच पोस्टमध्ये दिलेला फोटो पाकिस्तानातील पहिल्या महिला शीख पत्रकार मनमीत कौर यांचा आहे. 24 वर्षीय मनमीत यांनी 2018 सालीच काम सुरू केले आहे. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:या पाकिस्तानी महिला पत्रकाराने वाजपेयींना काश्मीर मागितले नव्हते. जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False