पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवर चढून आत्महत्या केलेल्या युवकाचा व्हिडियो नाशिकचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

रेल्वेवर चढून उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श करून आत्महत्या करणाऱ्या युवकाचा व्हिडियो सोशल मीडियावर झपाट्याने शेयर केला जात आहे. तारेला हात लावताच आगीत पूर्णतः भाजलेल्या युवकाचा हा व्हिडियो अत्यंत भयावह आहे. ही घटना नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर घडल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी

सदरील घटना खरंच नाशिक स्टेशनवर जर घडली असती तर खूप मोठी बातमी ठरली असती. परंतु, गुगलवर सर्च केल्यावर अशी कोणतीही बातमी आढळली नाही. यावरून ही घटना तेथील असण्याविषयी शंका निर्माण होते. 

गुगलवर याविषयी अधिक शोध घेतला असता हुडसाईट वेबसाईटवरील 19 नोव्हेंबर रोजीची बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, ही घटना पश्चिम बंगालमधील मालदा रेल्वेस्थानकावरील घटना आहे. सदरील व्यक्तीचे नाव विनोद बुईयान आहे. 

विविध संकेतस्थळावरील बातम्यांनुसार, त्रिपुरा येथे मोलमजुरी करणारा विनोद मालदा येथे एका लग्नासाठी आला होता. मात्र, येथे विनोदचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात तो फराक्का एक्सप्रेस रेल्वेवर चढला. इतर लोकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. यावेळी विनोदचे तीन लहान मुलेदेखील उपस्थित होती. परंतु, त्याने हायव्होल्टेज तारेला स्पर्श करून आपले जीवन संपविले. विजेच्या धक्क्याने जळाल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तो 95 टक्के भाजला होता. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली होती.

अधिक सविस्तर येथे वाचा – द वॉलएशियनेट बांग्ला

फॅक्ट क्रेसेंडोने मग मालदा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. तेथील सहायक उपनिरीक्षक अनुपम सरकार यांनी माहिती दिली की, “सदरील व्हिडियोतील घटना मालदा रेल्वे स्टेशनवर रविवारी सायंकाळी घडली होती. मृत व्यक्ती झारखंडमधील हजारीबाग येथील रहिवासी होता. रेल्वेची वाट पाहत असताना पत्नीशी वाद झाल्यामुळे विनोद फराक्का एक्प्रेसवर चढला आणि वायरला हात लावून त्याने आत्महत्या केली. रेल्वे पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.”

विनोद यांना दवाखान्यात घेऊन जातानाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

निष्कर्षः

रेल्वेवर चढुन हायव्होल्टेज वायरला हात लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडियो नाशिकमधील नाही. तो व्हिडियो पश्चिम बंगालमधील मालदा रेल्वेस्थानकावरील आहे. विनोद बुईयान नामक व्यक्तीने पत्नीशी वाद झाल्यानंतर अशा पद्धतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे सदरील व्हिडियोला नाशिकचा म्हणून शेयर करणे चुकीचे आहे.

Avatar

Title:पश्चिम बंगालमध्ये रेल्वेवर चढून आत्महत्या केलेल्या युवकाचा व्हिडियो नाशिकचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False