
सोशल मीडियावर पोस्ट पसरत आहे की, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. सोशल मीडियावर अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात शेयर केल्या जात आहेत. या दाव्याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

युवा धनगर नावाच्या फेसबुक पेजवर 2 एप्रिल रोजी रात्री 10.06 वाजता अपलोड केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्राला सैराट चित्रपटाच्या माध्यमातून वेड लावणारे सैराट दिग्दर्शक मा. नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठींबा देऊन वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अनेकांनी या पोस्टच्या सत्यतेविषयी कमेंटमध्ये शंका उपस्थित केली आहे. (आता ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे)
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये नागराज मंजुळे यांनी कधी, कुठे आणि कोणाच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला याचा उल्लेख नाही. तसेच त्यांच्या प्रवेशाचा कोणताही फोटोदेखील उपलब्ध नाही.
नागराज मंजुळे यांच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकांउंटवरदेखील अशी त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही.
गुगलवर नागराज मंजुळे आणि वंचित बहुजन आघाडीविषयीच्या बातम्यांचा शोध घेतला असता तेव्हादेखील मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याचे आढळले नाही.
यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने थेट वंचित बहुजन आघाडीशी 3 एप्रिल रोजी संपर्क साधून याविषयी विचारणा केली. तेव्हा प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी स्पष्टपणे नकार देत सांगितले की, “नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला नाही. अशा तऱ्हेच्या बातम्या आणि पोस्ट खोट्या आहेत. त्यांचा (मंजुळे) आमच्या पक्षात प्रवेश झाला, असे कुठलेही पत्र आम्ही काढलेले नाही.”
वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता दिशा पिंकी शेख यांनीदेखील फॅक्ट क्रेसेंडोला मोबाईल संदेश पाठवून वरील वृत्ताचे खंडन केले. नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्याची बातमी खरी नाही, असे त्यांनी सांगितले.
निष्कर्ष
नागराज मंजुळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी फेटाळले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Title:तथ्य पडताळणीः नागराज मंजुळे यांनी खरंच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
