कोमल मिश्रा नावाच्या नर्सच्या निधनाची बातमी फेक आहे. फोटोतील मुलगी जिवंत आहे. वाचा सत्य

Coronavirus False

सोशल मीडियावर कोमल मिश्रा नामक एका कथित नर्सच्या मृत्यूबाबत मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजनुसार, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचा इलाज करणाऱ्या नर्स कोमल मिश्रा हिचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथील ती रहिवासी होती, असादेखील दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय आहे पोस्टमध्ये?

Jodmoha.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्हफेसबुक । अर्काइव्ह

जोडमोहा जि. यवतमाळ येथील कोमल मिश्रा ही पुणे येथे नायडू हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना कोरोनाची लागण झाली आणि आज सायंकाळी 5.30 वाजता तिचे निधन झाले, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट पसरल्यानंतर काही वेबसाईट्सने त्यावरून बातमीदेखील दिली. 

जनता रक्षक नावाच्या एक वेबसाईटने अशीच बातमी दिली की, यवतमाळ जिल्ह्यातील जोड मोहा येथील भगिनी कुमारी कोमल मिश्रा स्टाफ नर्स नायडू हॉस्पिटल येथे सवेवर असताना कोरोना मुळे दुःखद निधन

janta.png

मूळ बातमी येथे वाचा – जनता रक्षकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये खरंच कोमल मिश्रा नामक नर्सचे कोरोनामुळे निधन झाले का याचा तपास केला. पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याकडे नायडू हॉस्पिटलची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, नायडू हॉस्पिटलमध्ये कोमल मिश्रा नावची कोणीही नर्स नाही. सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज केवळ अफवा आहे. येथे कोणत्याही नर्सचे कोरोनामुळे निधन झालेले नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग यवतमाळ जिल्हातील कळंब तालुक्यातील जोडमोहा गावाचे सरपंच ज्ञानेश्वर डहारे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, “सोमवारपासून कोमल मिश्रा यांच्या निधनाचा मेसेज आम्हाला प्राप्त झाला. त्यानंतर आम्ही गावात सखोल चौकशी केली. मतदार याद्यांची तपासणी केली. परंतु, मिश्रा आडनावाचे कोणतेही कुटुंब जोडमोहा गावात राहत असल्याचे आढळले नाही. कोमल मिश्रा अशा नावाच्या मुलीचे कोणतेही नातेवाईक अथवा पालक आमच्या गावात नाहीत. सोशल मीडियावर जोडमोहा गावाच्या नावाने असे खोटे मेसेज का फिरवत आहे हाच आम्हाल प्रश्न पडला आहे.”

जोडमोहा गावातील पोलिस पाटील सुमन राजूरकर यांनीदेखील कोमल मिश्रा नावाची मुलीबाबतचा मेसेज खोटा असल्याचे सांगितले. “सोशल मीडियावर आमच्या गावाच्या नावाने मेसेज व्हायरल झाल्यानंतर आम्ही गावात तपासणी केली. परंत, कोमल मिश्रा नावाची कोणतीही मुलगी पुण्यात नायडू हॉस्पीटलमध्ये काम करत नसल्याचे कळाले. गावात या नावाची कोणतीही मुलगी नाही.” असे त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.

जोडमोहा येथील आरोग्य सेवक डॉ. राजेश वाडी यांनी सांगितले की, कोमल मिश्राचा मेसेज पसरू लागल्यानंतर मी स्वतः गावात फिरलो. परंतु, अशा नावाची मुलगी गावात असल्याचे आढळले नाही. एवढेच नाही तर, गट ग्रामपंचायत असलेल्या जवळच्या खटेश्वर गावातही चौकशी केली. “तेथेदेखील मागील दहा वर्षांपासून कोणीही मिश्रा नावाचे कुटुंब राहत नाही. सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो आणि कोमल मिश्रा ही मुलगी नेमकी कोण याची आम्हाला काहीच माहिती नाही. परंतु, जोडमोहा गावाशी या दोन्ही बाबींचा काहीच संबंध नाही.”

फॅक्ट क्रेसेंडोने गावकऱ्यांशीदेखील चर्चा केली. त्यांनीदेखील गावात मिश्रा नावाचे कुटुंब नसल्याचे सांगितले. एका गावकऱ्याने सांगितले की, “मिश्रा हे आमच्या समाजातील आडनाव आहे. परंतु, आमच्या समाजाचे कोणीही या गावात नाही. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर माझ्या अनेक नातेवाईकांनी मला विचारणा केली. त्यांनासुद्धा मी हेच सांगितले की, ही मुलगी जोडमोहा गावातील नाही.”

यावरून स्पष्ट होते की, यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा गावात कोमल मिश्रा नावाची कोणतीही मुलगी  नाही. 

मग हा फोटो कोणाचा आहे?

व्हायरल होत असलेला फोटो शशिकला ठाकरे या मुलीचा आहे. ती भंडारा जिल्ह्यातील धर्मापूरी येथील रहिवासी असून, तिच्या फोटोचा गैरवापर करून अफवा पसरविण्यात आली आहे. तिने साकोली पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार दिलेली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना तिने सांगितले की, मी सेंदुरवाफा येथील एका नर्सिंग होम येथे गेले 3 महिने काम करीत आहे. 20 एप्रिल रोजी माझ्या एका मैत्रिणीने मला व्हॉट्सअपवर व्हायरल होत असलेल्या पोस्टचा फोटो पाठवला. त्यात माझा फोटो वापरून कोमल मिश्रा नावाच्या नर्सच्या निधनाची खोटी बातमी पसरविण्यात आली होती. हा फोटो माझा फेसबुकवर डीपी होता. कोणीतरी तो वापरून चुकीच्या माहितीसह पसरविला आहे. त्याविरोधात मी साकोली पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे.

शशिकला हिने फॅक्ट क्रेसेंडोला तिच्या तक्रारीचा फोटो पाठविला. त्यासोबतच तिने सोशल मीडियावरील खोट्या बातम्या न पसरविण्याचे आवाहन करणारा व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोला पाठविला. 

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, सोशल मीडियावर कोमल मिश्राच्या नावे व्हायरल होणारी पोस्ट असत्य आहे. शशिकला ठाकरे या मुलीच्या फोटोचा गैरवापर करून खोटी अफवा पसरविण्यात आली आहे. ती जोडमोहा गावातील नसून, भंडारा जिल्हातील धर्मापूर येथील रहिवासी आहे. तिला कोरोनाची लागण झालेली नसून, खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांविरोधात तिने पोलिसांत रितसर तक्रार दिली आहे.

Avatar

Title:कोमल मिश्रा नावाच्या नर्सच्या निधनाची बातमी फेक आहे. फोटोतील मुलगी जिवंत आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False