उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले होते; मुघल सम्राट औरंगाबजला नाही

False राजकीय | Political

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते “औरंगजेब देशासाठी शहीद” झाला असे म्हणतात. या क्लिपसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी कळाले की, हा व्हिडिओ अर्धवट आहे. उद्धव ठाकरे औरंगजेब नावाच्या एका भारतीय सैनिकाबद्दल बोलत होते.

काय आहे दावा?

तीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, “कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब. जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं – छे! छे! तो मुसलमान होता? नाही. जो माझ्या मातृभूमीसाठी मरायला तयार आहे, मग तो धर्माने कोणीही असला, तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे.”

या व्हिडिओसोबत युजर्स लिहित आहेत की, सत्तेसाठी वाटेल ते करायला, बोलायला यांना लाज नाही कां वाटतं औरंगजेब शहीद झाला म्हणते.

दुसऱ्या युजरने म्हटले की, उद्धव ठाकरेंच्या मते हजारो हिंदू मंदिरे तोडून त्यावर मशिदी बांधणारा औरंगजेब देशासाठी शहीद झाला.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम उद्धव ठाकरेंचे मूळ भाषण शोधले. टीव्ही-9 मराठी चॅनेलवर 8 जून 2022 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील सभेमध्ये बोलत होते. 

संपूर्ण भाषण नीट ऐकल्यावर कळाले की, उद्धव ठाकरे लष्करी जवान औरंगजेब याच्याबद्दल बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत. असाच एक भारतीय जवान सुट्टीसाठी आपल्या घरी चालला होता. दरम्यान वाटेतच त्याचं अपहरण करण्यात आलं. काही दिवसांनी त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेत आढळला. तो भारतीय जवान धर्माने मुस्लीम होता आणि त्याचं नाव औरंगजेब होतं. देशासाठी शहीद होणारा हा औरंगजेब आमचाच आहे. देशासाठी प्राण देणारा प्रत्येक मुसलमान आमचाच आहे.”

कोण होता शहीद औरंगजेब?

ईदच्या सुट्टीनिमित्त घरी परत जात असताना रायफलमॅन औरंगजेबचे 14 जुन 2018 रोजी दहशदवाद्यांनी पुलवामा येथून अपहरण केले होते. काही दिवसांनंतर औरंगजेबचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. 

औरंगजेब दक्षिण काश्मीरमधील 44 बटालियन राष्ट्रीय रायफल्सचा सदस्य होता. त्याच्या मृत्यूनंतर तेरा महिन्यांनी त्याचे दोन्ही भाऊ सैन्यात भरती झाले. त्याचे वडीलही लष्करात होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, उद्धव ठाकरे यांचा अर्धवट व्हिडिओ शेअर करून चुकीचा प्रचार केला जात आहे की, त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबला शहीद म्हटले. उद्धव ठाकरे भारतीय लष्कराचा जवान औरंगजेब याच्याबद्दल बोलत होते.

Avatar

Title:उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले होते; मुघल सम्राट औरंगाबजला नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False