
पुराणग्रंथातील पात्र खरी आहेत की नाही, हा वाद सुरूच असतो. त्यातल्या त्यात आता सोशल मीडियावर सनसनाटी दावा केला जात आहे की, महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्कच याचा 80 फुटांचा विशाल सांगडा सापडला आहे. कुरुक्षेत्र येथे काही विदेशी पुरातत्व अभ्यासकांना उत्खननात हा सांगडा सापडला होता. परंतु, काँग्रेस सरकारने हा शोध सामान्य जनतेपासून लपून ठेवला होता, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत दिलेल्या फोटोमध्ये एक महाकाय मानवाचा संपूर्ण सांगडा दिसतो. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
जमिनीवर ठेवलेल्या एका मोठ्या सांगड्याचा फोटो शेयर करून सोबत लिहिले की, कुरुक्षेत्रजवळ उत्खनन करणाऱ्या काही विदेशी पुरातत्व अभ्यासकांना एक 80 फुटांचा मानवी सांगडा सापडला. महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्काच याच्या वर्णनाशी हा सांगडा मिळताजुळता आहे. काँग्रेस सरकारने हा शोध जनतेसमोर येऊ दिला नाही. डिस्कव्हरी चॅनेलवर याविषयी कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यावरून सिद्ध होते की, महाभारत ही काही काल्पनिक गोष्ट नाही.
तथ्य पडताळणी
घटोत्कच हा महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढलेला पराक्रमी योद्धा होता. तो भीम-हिडिंबा यांचा पुत्र होता. त्याच्या पराक्रमामुळे कौरवांचा दारुण पराभव होण्याची वेळ आली होती. अखेर इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून कर्णाने घटोत्कचाला मृत्युमुखी पाडले. मरतामरतासुद्धा त्याने आपले शरीर मोठ करून कौरवांच्या सैनिकांवर पडला.
डिस्कव्हरी चॅनेलवर किंवा वेबसाईटवर घटोत्कचचा सांगडा मिळाल्याची कोणतीही बातमी अथवा व्हिडियो आढळला नाही. त्यामुळे पोस्टमध्ये दिलेला फोटो नेमका आहे हे शोधण्यासाठी गुगलवर फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, 80-फुटी सांगडा इटलीतील एका शहरातील कला प्रकल्प आहे. सदरील फोटोतील सांगडा मिलानमधील पलाझो रियाले येथे 2007 साली प्रदर्शनासाठी मांडण्यात आला होता.

मूळ लेख येथे वाचा – झूमाटा । अर्काइव्ह
जिनो दि डॉमिनिक्स नावाच्या कलाकाराने 1988 साली हा सांगडा तयार केला होता. “कॉस्मिक मॅग्नेट” या नावाने तो ओळखला जातो. पॉलिस्टिरीनपासून तयार करण्यात आलेल्या या सांगड्याचे वजन आठ टन आहे. हा पुतळा युरोपमधील वेगवेगळ्या देशामध्ये प्रदर्शनासाठी ठेवला जातो. इंटरनेटवर याचे अनेक फोटोदेखील उपलब्ध आहेत.

डॉमिनिक्सच्या कलात्मकशैलीनुरूप या सांगड्याचे नाक टोकदार आहे. इटलीमध्ये गेल्यावर अनेक पर्यटक या सांगड्याला आवर्जून भेट देतात. जगभरातील प्रवाशांमध्ये या सांगड्याविषयी आकर्षण आहे. सध्य हा पुतळा इटलीतील फोलिंगो शहरात ठेवण्यात आला आहे. ट्रॅव्हल इन इटली नावाच्या युट्यूब चॅनेलने अपलोड केलेल्या व्हिडियोनुसार, मानवी सांगड्याच्या आकारानुरूप अगदी अचूक असा हा सांगडा आहे.
निष्कर्ष
सदरील सांगडा हा काही खराखुरा सांगडा नाही. इटलीमधील कलाकार जिनो दि डॉमिनिक्स याने 1988 साली तयार केलेला हे एक आर्ट इन्स्टॉलेशन आहे. 80 फुटांचा हा सांगडा घटोत्कचचा नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:FACT CHECK: कुरुक्षेत्र येथे घटोत्कच याचा 80-फुटांचा विशाल सांगडा सापडला का? वाचा सत्य काय आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
