VIDEO FACTS:रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेल्या दुचाकीचा व्हिडियो मुंबईचा नाही. तो जालन्याचा आहे

False राष्ट्रीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मुंबईत पावसाने थैमान घातलेले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी साचल्याने मुंबईकरांची चांगली दैना उडाली आहे. अनेक सखल भागात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कंबरेइतक्या पाण्यातून जाण्याऱ्या वाहनांचे दृश्य तर टीव्हीवर रोज दिसते. सोशल मीडियावर तुंबलेल्या मुंबईची खरी स्थिती दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये रस्तावरील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात पूर्ण दुचाकीच पडल्याचे दिसते. ही घटना मुंबईतील चेंबुर भागात घडल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमधील 51 सेंकदाच्या क्लिपमध्ये भरपावसात काही लोक पाण्यात बुडालेली एक दुचाकी ओढून बाहेर काढत असल्याचे दिसते. मुंबईतील चेंबुरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकी त्यात बुडाली, असा दावा कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

तथ्य पडताळणी

यासंबंधी गुगलवर शोध घेतला असता काही वेबसाईट्सने ही बातमी दिल्याचे आढळले. ट्विटरवरदेखील हा व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

मात्र इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात फिरू लागल्यावर मुंबई महापालिकेने यासंबंधी ट्विट करून खुलासा केला की, हा व्हिडियो चेंबुर किंवा मुंबईतला नाही. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेयर करण्यापूर्वी सत्यतेबाबत खातरजमा करण्याचेही महापालिकेने आवाहन केले. फ्री-प्रेस जर्नलनेसुद्धा ही बातमी दिली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

मग हा व्हिडियो जर मुंबईतील नाही तर कुठला आहे?

मुंबई महापालिकेने या व्हिडियोसंदर्भात केलेल्या ट्विटखाली ऋषीकेश इंगळे नामक एका युजरने अभिजीत देशमुख यांच्या ट्विटचा आधाऱ घेत लिहिले की, सदरील व्हिडियो जालना येथील आहे. अभिजीत देशमुख यांनी 2 जुलै रोजी ट्विट केले होते की, महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हा व्हिडियो माझे मूळ गाव जालना येथील आहे.

अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा अभिजीत देशमुख यांच्या ट्विटर अकाउंटची तपासणी केली तेव्हा आणखी एक व्हिडियो आढळला. यामध्ये त्यांनी मुंबई महापालिकेला उत्तर देताना हा व्हिडियो जालना येथील असल्याचे सांगणारा एक व्हिडियो ट्विट केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये ती दुचाकी जेथे पाण्यात बुडाली होती, ती जागा दाखविण्यात आली आहे. त्यांनी लिहिले की, चेंबुर येथील म्हणून पसरविला जाणार हा व्हिडियो मूळात जालना येथील आहे. जालना शहरातील सरस्वती भुवन हायस्कूल जवळील भागात ही घटना घडली होती. माझा पुतण्या वेदांत देशमुखने माझ्या विनंतीवरून हा व्हिडियो तयार केला. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधून यासंबंधी माहिती घेतली.

अर्काइव्ह

जुन्या जालन्यातील टाऊन हॉल परिसरातील ही जागा आहे. व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसते की, दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेली नव्हती. रस्त्यालगतच्या फुटपाथला लागून असलेल्या नालीत ती पडली होती. या उघड्या नालीवर ढापे नाहीत. याबाबत आणखी शोध घेतल्यावर स्थानिक वर्तमानपत्र दैनिक लोकमतची एक बातमी आढळली. जालन्यामध्ये 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळ सखल भागात पाणी साचले होते. हॅलो लोकमतमधील 3 जुलै रोजीच्या बातमीत उल्लेख आहे की, जुना जालना भागातील टाऊन हॉल येथील मुख्य चौकात असलेल्या नालीत ढापा नसल्याने एक गाडी त्यात पडली. स्थानिक पत्रकारांनीसुद्धा हा व्हिडियो जालना येथील असल्याची पुष्टी दिली.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत ई पेपर । अर्काइव्ह

व्हायरल व्हिडियो आणि त्याच जागेवर काढलेला दुसरा व्हिडियो यांची तुलना खाली दिलेल्या व्हिडियोत केली आहे. यावरून अधिक चांगल्याप्रकारे समजते की, व्हायरल होत असलेला व्हिडिया मूळात जालना येथील आहे.

निष्कर्ष

पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून बुडालेल्या दुचाकीला बाहेर काढतानाचा व्हिडियो मुंबईतील चेंबुर येथील नाही. हा व्हिडियो जालना येथील टाऊन हॉल भागातील आहे. 2 जुलै रोजी ढापे नसलेल्या नालीत ही दुचाकी पडली होती.

Avatar

Title:VIDEO FACTS:रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडलेल्या दुचाकीचा व्हिडियो मुंबईचा नाही. तो जालन्याचा आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •