FACT CHECK: या तिन्ही बहिणी IAS अधिकारी झाल्या का? वाचा सत्य काय आहे

False सामाजिक

खडतर परिस्थितीमध्ये अभ्यासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या उमेदवारांच्या प्रेरणादायी कथा सर्वांनाच आवडतात. अशीच एक यशोगाथा कमला, गीता आणि ममता तीन बहिणींची आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर या तिन्ही बहिणींच्या डोक्यावरून पितृछत्र हरवले होते. त्यांच्या विधवा आईने मोठे कष्ट सोसून तिन्ही मुलींना शिकवले. त्याचे फळ म्हणजे तिन्ही बहिणी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी बनल्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

इंडिया लव्हर नावाच्या फेसबुक पेजने 20 जून रोजी पोस्ट शेयर केली की, तीनों बहने एक साथ बनी IAS. दिनरात खेतों में काम करने वाले विधवा मां की तीनों बेटियां एक साथ बनी IAS,, कमला 32 वीं, गीता 62 वीं, ममता ने 132 वीं रैंक प्राप्त की इन तीनों को बहुत-बहुत हार्दिक बधाई.

तथ्य पडताळणी

याविषयी गुगल सर्च केल्यावर नई दुनिया वेबसाईटवरील 24 नोव्हेंबर 2017 रोजीची एक बातमी समोर येते. यामध्ये या तिन्ही बहिणींच्या यशाची कहाणी सांगितली आहे. कमला, ममता आणि गीता चौधरी असे या तिन्ही बहिणींचे नाव आहे. त्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील सारंग का बास  येथील आहेत. वडिलांचे निधन झाल्यावर आई मीरा चौधरी यांनी या तीन बहिणी आणि एक मुलगा यांचे पालनपोषण केले. आईने शेतीमध्ये घाम गाळून तिन्ही मुलींना शिकवले. बहिणींच्या शिक्षणासाठी भावानेसुद्धा शाळा सोडून काम करायला सुरुवात केली. आईच्या कष्टाचे चीज करीत या बहिणींनीसुद्धा शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

नई दुनियाच्या बातमीनुसार, तिन्ही बहिणींनी 2016 साली घेण्यात आलेल्या राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत (RAS) यश मिळवत ओबीसी प्रवर्गातून 32 (कमला), 64 (गीता) आणि 128 (ममता) वा रँक मिळवला. बातमीत स्पष्ट म्हटले की, तिन्ही बहिणींनी दोन वर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षासुद्धा दिली होती. पण, काही गुणांमुळे त्या अयशस्वी ठरल्या.

मूळ बातमी येथे वाचा – नई दुनियाअर्काइव्ह

आय नेक्स लाईव्ह आणि लल्लनटॉपने दिलेल्या बातमीनुसार, या तिन्ही बहिणींनी IAS नाही तर RAS परीक्षा पास केली होती. IAS परीक्षेतून केंद्र सरकारअंतर्गत भारतात कुठेही नोकरी मिळू शकते. RAS परीक्षेत यश मिळवल्यावर राजस्थान राज्यातच नोकरी मिळते. या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या असून, दोन्ही प्रकारचे अधिकारी वेगळे असतात. IAS परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात येते तर, RAS परीक्षा राजस्थान लोकसेवा आयोगातर्फे (RPSC)  घेण्यात येते.

व्ही टीव्ही गुजरातने याविषयी तथ्य पडताळणी केली होती. 27 ऑक्टोबर 2017 साली अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडियोमध्येसुद्धा या चौधरी भगिनींनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत रँक मिळवला होता. सोशल मीडियावरील IAS अधिकारी झाल्याचा दावा खोटा होता.

निष्कर्ष

विधवा आईने काबाडकष्ट करून तीन मुलींना शिकवून IAS अधिकारी बनविल्याचा दावा खोटा आहे. राजस्थानमधील कमला, गीता आणि ममता चौधरी या तीन बहिणींनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत रँक मिळवत RAS अधिकारी होण्याचा मान मिळवला. 

Avatar

Title:FACT CHECK: या तिन्ही बहिणी IAS अधिकारी झाल्या का? वाचा सत्य काय आहे

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False