Fact Check : ‘एसटी’च्या स्मार्ट कार्डमुळे 4 हजार किलोमीटर मोफत प्रवास?

False सामाजिक

*जेष्ठ नागरिकांसाठी खुष खबर….* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ४००० किलो मीटर प्रवास मोफत करता येणार आहे. त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. आपले *आधार कार्ड* व *मतदान कार्ड* किंवा *मतदान स्लीप,* आणि *₹ ५५/-* घेऊन आपणास जवळच्या एसटी डेपोत जावे लागेल. जाताना स्वतःचा मोबाईल नेण्यास विसरू नये. वेळ *सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत* आहे. काही भागात ही वेळ वेगळी असू शकेल. हा मेसेज *६५ वर्षावरील आपले आप्त ,सहकारी व मित्रांना पाठवावा.*, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Chiplunites या पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने अशी काही योजना आणली आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना काय सवलती देण्यात येत आहेत याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी याठिकाणी आम्हाला खालील माहिती दिसून आली. या माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाकडून साध्या, निमआराम, शिवशाही (स्लिपर आणि सिटिंग) बसमध्ये प्रवासभाड्यात सवलत 4 हजार किलोमीटरपर्यंत देण्यात येत आहे. साध्या, निमआराम बसमध्ये प्रवासभाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. आसन व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 45 टक्के आहे. शयनशान व्यवस्था असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासभाडयात ही सवलत 30 टक्के आहे. 

सविस्तर माहिती : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ संकेतस्थळ (Archive)

गुगलवर मराठीत एसटीची स्मार्ट कार्ड योजना असे टाकले तेव्हा खालील परिणाम समोर आला. दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ताने या योजनेविषयी वृत्त दिले आहे. मॅक्स महाराष्ट्रने आपल्या वृत्तात हे कार्ड रिचार्ज करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

दैनिक पुढारीनेही एसटीच्या या स्मार्ट कार्ड योजनेविषयी वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 55 रुपये भरून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळत असून, हे नोंदणी शुल्क आहे. स्मार्ट कार्ड योजनेंतर्गत ज्येष्ठांना 55 रुपयांत वर्षभराकरिता 4 हजार किलोमीटरचा मोफत प्रवास, या आशयाची जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोल्हापूर आगारातील एका लिपिकाने 55 रुपयांत 4 हजार किलोमीटरचा मोफत प्रवास ही पोस्ट व्हायरल केली असून, त्याच्यावर महामंडळाने कडक कारवाई केली आहे. प्रत्यक्षात तसे नसून 55 रुपयांत स्मार्ट कार्ड मिळणार आहे. ते वर्षभराकरिता वैध असेल. 65 वर्षांपुढील ज्येष्ठांना सवलत हवी असल्यास स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले असून, ते काढल्यासच ज्येष्ठांना एसटीतून प्रवासाकरिता सवलत मिळू शकेल.

दैनिक पुढारी / Archive 
निष्कर्ष

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे ही बाब सत्य असल्याचे विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तातुन दिसून येत आहे. या योजनेतंर्गत 4 हजार किलोमीटर प्रवास मोफत करता येतो ही बाब मात्र असत्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सवलती असल्याचे दिसते मात्र या योजनेतंर्गत 4 हजार किलोमीटर मोफत प्रवास ही बाब कुठेही दिसत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : ‘एसटी’च्या स्मार्ट कार्डमुळे 4 हजार किलोमीटर मोफत प्रवास?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False