FACT CHECK: विक्रम लँडरसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला का? वाचा सत्य काय आहे.

False राष्ट्रीय

चांद्रयान-2 मोहिमेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्रावर उतरताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि तमाम भारतीयांचे मन सुन्न झाले. अवघ्या दोन किमीचे अंतर राहिलेले असताना विक्रम लँडर 6 सप्टेंबर रोजी दिशा भटकले आणि संपर्काच्या बाहेर गेले. परंतु, लगेच दोन दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर आघाती अवतरण झालेल्या विक्रम लँडरचा पत्ता लागला. पण त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होऊ शकला का? जनशक्ती वेबपोर्टलने यासंदर्भात दिलेल्या बातमीच्या शीर्षकात म्हटले की, हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

जनशक्ती वेबपोर्टलच्या फेसबुक पेजवर 8 सप्टेंबर रोजी “अखेर विक्रम लँडरसोबत संपर्क, इस्रोचे मोठे यश” अशा मथळ्याची एक बातमी शेयर करण्यात आली. यात म्हटले की, विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ही आनंदवार्ता दिली.

मूळ बातमी येथे वाचा – जनशक्तीअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

‘चांद्रयान-2’ने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून 22 जुलै रोजी उड्डाण केले होते. दीड महिन्यांच्या प्रवासानंतर अखेर ते चंद्राजवळ पोहचले. मोहिमेचा शेवटचा टप्पा म्हणून विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचे होते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या पृष्ठाभागापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असताना विक्रमचा संपर्क तुटला.

अर्काइव्ह

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, चंद्राच्या पृष्ठभागावार जेथे विक्रम लँडर पडले आहे ते ठिकाण सापडले आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रम लँडरची थर्मल इमेज काढली आहे. मात्र, विक्रम लँडरशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

अर्काइव्ह

लोकसत्ताच्या बातमीनुसार, सिवन यांनी वृत्तसंस्थांना सांगितले, की चंद्राच्या पृष्ठभागावर आम्हाला विक्रम लँडर आढळले आहे. त्याचा अर्थ त्याचे अलगद अवतरण होण्याऐवजी ते कोसळले असावे. या लँडरमध्ये ‘प्रज्ञान’ ही बग्गीसारखी गाडी आहे. ती अलगद अवतरणानंतर बाहेर येणे अपेक्षित होते. चांद्रयान २ मोहिमेतील ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यांनी टिपलेल्या चांद्रभूमीच्या छायाचित्रांमध्ये ‘विक्रम लँडर’ दिसत आहे. ऑर्बिटरवर असलेल्या औष्णिक प्रतिमा चित्रण कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपले आहे. लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इस्रोच्या अधिकृत ट्विटर पेजवरूनसुद्धा हीच माहिती देण्यात आली.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे चंद्रवरील केवळ ठिकाण सापडले आहे. इस्रोतर्फे त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क झाला, असे शीर्षक वाचकांना चुकीची माहिती देते.

Avatar

Title:FACT CHECK: विक्रम लँडरसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला का? वाचा सत्य काय आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False