व्हायरल CCTV व्हिडियोतील बॅग चोरीची घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही. वाचा सत्य

False सामाजिक

रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडियोमध्ये चालत्या रेल्वेत चढून महिला प्रवाशाची बॅग पळवून नेण्याची घटना कैद झालेली आहे. ही घटना मुंबई-पुणे दरम्यान चालणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

एका मिनिटाच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डब्याच्या दरवाजापाशी एक महिला प्रवासी उभी आहे. बोगद्यामधून जाणारी ही रेल्वे संथ वेगाने पुढे जात आहे. तेव्हा अचानक बोगद्यातून एक तरुण डब्यात चढतो आणि महिलेच्या हातातील बॅग हिसकावून खाली पळून जातो. त्याच्या ओढण्याचा जोर एवढा होता की, ती महिला डब्याबाहेर जाता जाता वाचते.

युजरने दावा केला की, पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकArchive

तथ्य पडताळणी 

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अशी काही चोरीची घटना घडली का याचा शोध घेतला असता तशी कोणतीही बातमी मिळाली नाही. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग मध्य रेल्वेचे वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी व्ही. चंद्रशेखर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, ही घटना पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये घडलेली नाही. इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अंतर्गत भागात सध्या सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. त्यामुळे व्हायरल होत असलेला चोरीचा व्हिडियो इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही, असे त्यांनी सांगितले.

ट्विटरवर एका युजरने हा व्हिडियो पोस्ट करून ही घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील असल्याचा दावा केला होता. त्याला मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने उत्तर देताना हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. मध्ये रेल्वेने खाली मुद्यांच्या आधारे हे सांगितले-

1. इंद्रायणी एक्सप्रेस गाडीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

2. इंद्रायणी एक्सप्रेसमधील C-2 डब्याची अंतर्गत रचना सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे नाही.

3. मध्य रेल्वेकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. 

यासह आणखी पाच बाबींचा समावेश आहे. त्या तुम्ही खाली वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, ही घटना इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये घडलेली नाही. सदरील सीसीटीव्ही व्हिडियो इंद्रायणी एक्सप्रेसमधील नसल्याचे खुद्द मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. ही घटना नेमकी कुठे घडली यासंदर्भात तपास चालू आहे. अधिक माहिती समोर आल्यावर अपडेट करण्यात येईल. 

Avatar

Title:व्हायरल CCTV व्हिडियोतील बॅग चोरीची घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False