तथ्य पडताळणीः मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्क्यांनी वाढ झाली?

True राजकीय | Political राष्ट्रीय

गेल्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांच्या संसदीय समितीने विद्यमान सरकारच्या संरक्षण क्षेत्राविषयीच्या धोरणावर नाराजी व्यक्त करीत टीका केली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तर देशाच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित करण्याची तीव्रता आणखी वाढत आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, “मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमतअर्काइव्ह

लोकमतच्या फेसबुक पेजवरून ही बातमी 5 मार्च रोजी पोस्ट करण्यात आली. पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 2100 लाईक्स मिळाल्या तर, 1351 वेळा ती शेयर करण्यात आली.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

लोकमतच्या बातमीनुसार, सिताराम येचुरी यांनी केंद्रीय समितीच्या आकडेवारीचा दाखला देत खालील दावे केले आहेत.

– मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे.

– नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे.

– सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली.

फॅक्ट क्रेसेंडोने मग सीपीएमच्या या बैठकीचा शोध घेतला. पीटीआयने यासंबंधी इंग्रजीमध्ये वृत्त दिले आहे. त्यामध्येदेखील वरीलप्रमाणे दावे करण्यात आले आहेत. मूळ इंग्रजी बातमी येथे वाचा – पीटीआयअर्काइव्ह

माकपच्या (सीपीआय-एम) अधिकृत संकेतस्थळावर या बैठकीची अधिकृत प्रेसनोट उपलब्ध आहे. 4 मार्च रोजी काढण्यात आलेल्या या प्रेसनोटमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरबद्दल योग्य धोरण अवलंबविण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून, 2014-18 दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्के वाढ झाली आहे. तसेच सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. तसेच महिन्याला सरासरी 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली.

मूळ प्रेसनोट येथे वाचा – माकपअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग गुगलवर – terror Incidents up by 176% – असे सर्च केले असता इंडिया टुडेची एक बातमी समोर आली. 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या बातमीत गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संसदेत दिलेल्या एका लेखी उत्तरात 2014-18 दरम्यान दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे.

मूळ सविस्तर बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग केंद्रीय प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या (पीआयबी) अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधी शोध घेतला. त्यामध्ये 5 फेब्रुवारी 2019 रोजी गृहखात्याने जाहीर केलेली प्रेसनोट मिळाली. यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 2014 साली 222 दहशतवादी हल्ले तर 47 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला होता. 2018 साली दहशतवादी हल्ल्यांमध्ये 392 ने वाढ होऊन तो आकडा 614 पर्यंत पोहचला तर, मृत्यू पावलेल्या सुरक्षा जवानांच्या संख्येतही 44 ने वाढ होऊन तो आकडा 91 पर्यंत गेला.

मूळ प्रेसनोट येथे वाचा – पीआयबी

वरील आकडेवारीची मोजणी केली असता हे स्पष्ट होते की, 2014-18 दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्के वाढ झाली आहे.

याच कालावधीत सुरक्षा जवानांच्या मृत्यूमध्ये 93 टक्के वाढ झाली आहे.

तर पीआयबीने 13 फेब्रुवारी रोजी काढलेल्या प्रेसनोटमध्ये 2018 साली देशात 143 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी 11 दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. मूळ प्रेसनोट येथे वाचा  – पीआयबी

निष्कर्ष

पीआयबीच्या प्रेसनोटवरून हे स्पष्ट होते की, सरकारी आकडेवारीनुसार खरंच 2014 ते 2018 या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्के, तर यातून सुरक्षा जवानांच्या मृत्यूमध्ये 93 टक्के वाढ झाली आहे. म्हणून लोकमतच्या बातमीत माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरींनी केलेला दावा सत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176 टक्क्यांनी वाढ झाली?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: True