‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद होण्यासंदर्भात अमोल कोल्हे आणि शरद पवारांविषयी फेक न्यूज व्हायरल. वाचा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. फेब्रुवारी अखेरीस ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका बंद होण्याविषयी सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

दावा केला जात आहे की, शरद पवार यांच्या दबावामुळे ही मालिका होत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीचे ग्राफिक्स वापरून हा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर वरीलप्रमाणे पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः खुलासा करीत या सर्व खोट्या बातम्या असल्याचे सांगतले. 

डॉ. कोल्हे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आली की, गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे अनेक पोस्ट्स सोशल मीडिया वर फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे…मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असताना मालिकेच्या आशयाबद्दल चुकीची माहिती पसरवणे दुर्दैवी आहे! प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे परंतु मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही…

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकट्विटर

मग एबीपी माझाच्या बातमीचे काय?

शरद पवार यांच्या दबावामुळे मालिका बंद होत असल्याची बातमी ‘एबीपी माझा’ वाहिनीने प्रसारित केलेली नाही. हे ग्राफिक्स बनावट आहे. खुद्द ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिने अधिकृत ट्विटर हँडलवरून याविषयी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

एका युजरने हे ग्राफिक्स शेयर केल्यानंतर ‘एबीपी माझा’ने ट्विट करीत तक्रार केली की, “अक्षय देहनकर हा व्यक्ती एबीपी माझाचा लोगो, इमेजेस फोटोशॉप करुन बनावट तसेच समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर अर्थात ‘फेक न्यूज’ प्रसारीत करत आहे. अशी कुठलीही बातमी ‘माझा’ने प्रसारीत केली नाही. त्यामुळे या व्यक्तीवर तातडीनं कारवाई करावी ही विनंती.”

मुंबई पोलिसांनीदेखील याची तत्काळ दखल घेत उत्तर दिले की, आम्ही आपली तक्रार संबंधीत विभागाकडे सुपूर्द करीत आहोत. या ट्विटनंतर सदरील युजरने आपली पोस्ट डिलीट केली.

अर्काइव्ह

डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील या ग्राफिक्सची मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी लिहिले की, नमस्कार, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात व देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबाबत चुकीची आणि सामाजिक तेढ पसरवू पाहणाऱ्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती!

अर्काइव्ह

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्हिडियोद्वारेदेखील या खोट्या बातम्या असल्याचे स्पष्ट केले. तो व्हिडियो तुम्ही खाली पाहु शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, शरद पवारांच्या दबावामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका बंद होत असल्याचा खुलासा डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेला नाही. ‘एबीपी माझा’ वाहिनीच्या नावे तशी खोटी बातमी पसरविली जात आहे. डॉ. कोल्हे आणि ‘एबीपी माझा’ने मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे याविषयी तक्रार केलेली असून, मुंबई पोलिसांनी याची नोंद घेतली आहे.

Avatar

Title:‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद होण्यासंदर्भात अमोल कोल्हे आणि शरद पवारांविषयी फेक न्यूज व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •