
अलिकडच्या काळात चित्रपट अभिनेता शाहरुख खानविरोधात सोशल मीडियावर विविध पोस्ट पसरविल्या जात आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यावर आरोप करण्यात येतो की, त्याने पाकिस्तानला 44 कोटी रुपये मदत केली होती. हाच आरोप करीत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये साताऱ्यात शाहरुख खानच्या चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घातल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्टा क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली.
एकच राजे शिव छत्रपती माझे फेसबुक पेजवरून 6 मार्च 2019 वरील पोस्ट शेयर करण्यात आली होती. या पोस्टला पडताळणी करेपर्यंत 7500 पेक्षा लाईक्स आणि त्यावर 2500 कमेंट आहेत. तसेच ही पोस्ट 1600 पेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आली. इतर पेजरवरूनदेखील ही पोस्ट पसरविली जात आहे.

तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानला 44 कोटींची मदत करणाऱ्या शाहरुखला सातारकरांचा दणका. साताऱ्यात शाहरुख खानच्या चित्रपटांवर पूर्णपणे बंदी.”
सोशल मीडियावर यासंबंधीच्या एका पोस्टमध्ये एका वर्तमानपत्राच्या बातमीचा खालील फोटो आढळला. ती पोस्ट तुम्ही येथे पाहू शकता – फेसबुक । अर्काइव्ह

या बातमीनुसार धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी साताऱ्यात शाहरुख खानच्या चित्रपटावर बंदी घालण्याचे निवेदन दिल्याचे म्हटले आहे. बातमीत लिहिले आहे की, सातारा शहरातील सिनेमागृहांत शाहरुख खानचे चित्रपट लावले तर तोडफोड करण्यात येईल आणि त्याला सिनेमागृह मालकच जबाबदार राहतील, असा इशारा प्रशांत नलावडे यांनी दिला.
फॅक्ट क्रसेंडोने धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी असे निवेदन दिले असल्याचे मान्य केले. त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते. तसेच, निवेदनावर काही कारवाई झाली की नाही याची त्यांना माहिती नाही. त्यांनी स्वतः कोणत्याही सिनेमागृहाला यासंबंधी इशारा दिला नसल्याचे सांगितले.
या माहितीनंतर आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला. त्यांनी फॅक्ट क्रेसेंडोला स्पष्ट सांगितले की, सातारा शहरात शाहरुख खानच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आलेली नाही.
याचाच अर्थ की, शाहरुख खानच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची एका संघटनेने केवळ मागणी केली आहे. तशी बंदी घालण्यात आलेली नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, शाहरुख खानने पाकिस्तानाला 44 कोटी रुपये मदत करण्याचा दावा फॅक्ट क्रसेंडोने यापूर्वीच खोटा असल्याचे सिद्ध केलेले आहे. त्याबद्दल सविस्तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.
शाहरुख खानने खरंच पाकिस्तानला 44 कोटी रुपये दिले नाही! सत्य जाणून घ्या
निष्कर्ष
सातारा शहरात शाहरुख खानच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आलेली नाही, असे सातारा जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या सांगितले आहे. त्यामुळे बंदी घातल्याच्या पोस्ट असत्य आहेत. तसेच शाहरुख खानने पाकिस्तानला 44 कोटी रुपये मदत केलेली नाही, हे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे.

Title:सत्य पडताळणीः साताऱ्यात शाहरुख खानच्या चित्रपटांवर बंदी घातली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
