बंगालमध्ये राजभवनात ममता बॅनर्जींसमोर कार्यकर्त्यांनी “जय श्रीराम” घोषणा दिल्या का?

False राजकीय

पश्चिम बंगालची निवडणूक यंदा प्रचंड गाजली. ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी-शहा असा सामना पाहायला मिळाला. निकालाअंती बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत टीएमसीला धक्का दिला. त्यामुळे ममता विरोधी कार्याकर्त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियो क्लिपमध्ये काही लोक ममता बॅनर्जी समोर जय श्रीराम अशी घोषणा देताना दिसतात. या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

28 मे रोजीच्या पोस्टमध्ये 10 सेंकदाची एक क्लिप शेयर करण्यात आली आहे. यामध्ये ममता बॅनर्जी त्यांच्या सहकार्यांसोबत चालत येतात तेव्हा केशरी रंगाचे जॅकेट घातलेला एक व्यक्ती नमस्कार करतो. परंतु, ममता बॅनर्जी त्याच्याकडे पाहत तशाच निघून जातात. यावेळी व्हिडियोमध्ये “जय श्रीराम” अशा घोषणा ऐकू येतात.

यूजरने लिहिले की, सध्या बंगालमध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे; आलेला आहे नव्हे तर ममता बॅनर्जी यांनी तो ओढावून घेतला आहे. ममता बॅनर्जी जिथे कुठे जातात तेथे लोकांकडून “जय श्रीराम” च्या घोषणा दिल्या जातात. आज ममता बॅनर्जी जेव्हा राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी गेल्या तेव्हा तिथेही लोकांनी त्यांचे “जय श्रीराम” घोषणा देऊन स्वागत केले. ममता बॅनर्जी यांनी मात्र नेहमीप्रमाणे त्या घोषणांकडे खुनशी नजरेनेच पाहिले!

हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

या व्हिडियोतील फ्रेम कॅप्चर करून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर खालील व्हिडियो समोर आला. युट्यूबवर हा व्हिडियो 2 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता. 11 सेंकदाच्या या क्लिपमध्ये ममता बॅनर्जी आणि केशरी रंगाचे जॅकेट घातलेले पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्यामध्ये घडलेला हास्यविनोद टिपलेला आहे. आमच्या बंगाली सहकार्याने केलेल्या अनुवादानुसार, ममता बॅनर्जी घोष यांनी तब्येत कशी आहे असे विचारतात. त्यावर दिलीप घोष “’ठीक आहे” असे उत्तर देतात.

हा व्हिडियो आताचा नसून चार महिन्यांपूर्वीचा आहे. तसेच यामध्ये जय श्रीराम अशी घोषणादेखील देण्यात आलेली नाही.

मग ममता बॅनर्जींसमोर कोणी जय श्रीराम म्हटले होते का?

गुगलवर याचा शोध घेतला असता इंडियन एक्सप्रेसने 5 मे 2019 रोजी दिलेली बातमी समोर आली. यानुसार, बंगालमधील घटल मतदारसंघात रॅलीकरून परतत असताना ममता बॅनर्जी यांची गाडी जात असताना बल्लवपूर गावात काही लोकांनी “जय श्रीराम” असे नारे लावले होते. त्यामुळे चिडलेल्या ममता यांनी गाडी थांबवून घोषणा देणाऱ्यांना जबाब विचारला. परंतु, तोपर्यंत ते पळून गेले होते. पोलिसांना नंतर याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले होते.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसअर्काइव्ह

या संपूर्ण घटनेचा व्हिडियो पश्चिम बंगाल भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आला होता.

निष्कर्ष

फेसबुक पोस्टमधील व्हिडियो चार महिन्यांपूर्वीचा असून त्यामध्ये जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आलेल्या नाही. व्हिडोयोला एडिट करून जय श्रीरामच्या घोषणा त्यामध्ये टाकण्यात आल्या. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:बंगालमध्ये राजभवनात ममता बॅनर्जींसमोर कार्यकर्यांनी “जय श्रीराम” घोषणा दिल्या का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False