
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील काळाचौकी, अभ्युदय नगरच्या मैदानावरील सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. विविध वाहिन्या आणि संकेतस्थळांनीही याबाबतचे वृत्त दिले होते.
तथ्य पडताळणी
राज ठाकरे यांच्या सभेला निवडणूक आयोगाने खरंच परवानगी नाकारली होती का? याची पडताळणी करताना आम्हाला खालील पत्र आढळून आले. या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकसभा निवडणूक-2019 लढवत नसल्याने सदरचा जाहीर सभा परवानगीबाबतच्या अर्जाबाबत एक खिडकी योजनातंर्गत परवानगी देता येत नसल्याने संबंधित अर्जावर स्थानिक प्राधिकरणाकडूनच परवानगी देणे अपेक्षित आहे.

याचाच अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेची 2019 ची निवडणूक लढवित नसल्याने निवडणूक आयोगाच्या एक खिडकी योजनेच्या अधिकाऱ्यास ही परवानगी देण्याचा अधिकार नाही. मनसेने स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: याबाबत काय म्हणाले आहेत का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला राज ठाकरे यांचा खालील व्हिडिओ दिसून आला. यात 1 मिनिट 4 सेकंद ते 2 मिनिट 4 सेकंद या कालावधीत राज ठाकरे नेमके काय म्हणाले हे तुम्ही पाहू शकता.
या व्हिडिओतून हे स्पष्ट होत आहे की, 24 तारखेला जागा न मिळाल्याने त्यांनी ही सभा नंतर घेतली असावी. या घटनेबाबत कोणी वृत्त दिले आहे का हे शोधताना आम्हाला बीबीसी मराठीचे दिनांक 21 एप्रिल 2019 चे हे वृत्त दिसून आले. राज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली, असं वृत्त रविवारी सकाळी आलं होतं. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली, असं या वृत्तात म्हटलं होतं. मात्र त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याचं मुंबईच्या निवडणूक उप-अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने केलेले एक ट्विटही आम्हाला याबाबत आढळून आले.
Kindly note that the election machinery has not barred MNS chief Raj Thackeray from addressing a public meeting in Mumbai .The permission has been granted today through one window system of mumbai city district election office for meeting scheduled on 23rd april.
— electionmumbai (@electionmumbai) April 21, 2019
महाराष्ट्र टाईम्सने याबाबत नेमके काय-काय घडले याचे सविस्तर वृत्त दिले आहे. ते आपण खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.
निष्कर्ष
निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली नव्हती, असे म्हणता येत नाही. निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली होती, हे असत्य आहे.

Title:सत्य पडताळणी : राज ठाकरेंना निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली होती का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
