टिपू सुलतानचा खरा फोटो म्हणून एका अरब गुलाम व्यापाऱ्याचा फोटो व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

टिपू सुलतानचा खरा फोटो म्हणून एक कृष्णधवल फोटो पसरविला जात आहे. या फोटोची टिपूच्या लोकप्रिय छायाचित्राशी तुलना करून काँग्रेसवर टीका करण्यात येतेय की, क्रूरकर्मा टिपू सुलतानचा खरा फोटो लपवून काँग्रेस सरकारने त्याचे उदात्तीकरण करणारे चित्रच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये छापले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये टिपू सुलतानचे एक चित्र आणि एक कृष्णधवल चित्र शेयर करून म्हटले की, हा कृष्णधवल फोटो टिपूचे खरे छायाचित्र आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, काँग्रेसने टिपूचे बनावट चित्र देशासमोर आणले.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील कृष्णधवल फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर सदरील छायाचित्र अरब गुलाम व्यापाऱ्याचे असल्याचे समोर येते. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपध्याय यांनी 10 नोव्हेंबर 2018 रोजी वरील फोटो शेयर करून तो टिपू सुलतानचा खरा फोटो असल्याचा दावा केला होता. यापूर्वीदेखील 2017 साली हा फोटो शेयर करण्यात आला होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत हा फोटो टिप्पू टिप (Tippu Tip) नावाच्या एका आफ्रिकन-अरब गुलाम व हस्तीदंत व्यापाऱ्याचा आहे. त्याचा शोध घेतल्यावर अलामी या स्टॉक इमेज वेबसाईटवर हा फोटो दिला आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार, टिप्पू टिप (1832-1905) याचे पूर्ण नाव हमाद बिन मोहम्मद बिन जुमा बिन रजाब अल-मुरजेब असे आहे.

मूळ फोटो येथे पाहा – Alamy

परंतु, ट्विटरवर एका युजरने दावा केला की, हा फोटो रुमालिझा नावाच्या दुसऱ्या गुलाम व्यापाऱ्याचा आहे. त्याने या व्यापाऱ्याचा वेगळा फोटोदेखील शेयर केला आहे. विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रुमालिझाचे पूर्ण नाव मोहम्मद बिन खलफन बिन खमीस अल-बरवानी असे आहे. तो टिप्पू टिप याचा साथीदार होता. त्याच्या मदतीने रुमालिझा उजीजचा सुलतानसुद्धा झाला होता.

ट्विटमधील फोटोची पोस्टमधील फोटोशी तुलना केल्यावर रुमालिझाशी जास्त साम्य असल्याचे दिसते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, टिपू सुलतान यांचा मृत्यू 1799 साली झाला होता. जगातील पहिला फोटो 1926-27 साली काढण्यात आला होता. त्यामुळे त्यापूर्वी टिपू सुलतानचा फोटो उपलब्ध असण्याचा प्रश्नच नाही. ऑल्ट न्यूज, क्विंट, एसएम हॉक्सस्लेयर आदीसह इतरांनीदेखील यासंबंधी फॅक्ट चेक केलेले आहे.

निष्कर्ष

टिपू सुलतानचा फोटो म्हणून फिरवला जाणारा फोटो आफ्रिकन-अरब गुलाम व्यापारी टिप्पू टिप किंवा रुमालिझा यापैकी एकाचा आहे. कॅमेऱ्याचा शोध लागण्यापूर्वीच टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे छायाचित्र उपलब्ध नाही.

Avatar

Title:टिपू सुलतानचा खरा फोटो म्हणून एका अरब गुलाम व्यापाऱ्याचा फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False