VIDEO : इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक म्हणून “सिम्युलेशन” व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर अलिकडे ज्वालीमुखी निघाल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. बीड जिल्ह्यात जमिनीतून लाव्हारस बाहेर निघत असल्याचा व्हिडियो प्रचंड गाजला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातच 1200 फूट बोअरवेल घेतल्याने लाव्हा बाहेर पडून ट्रक खाक झाल्याच्या व्हिडियोने खळबळ माजवली होती. फॅक्ट क्रेसेंडोने हे दोन्ही दावे खोटे असल्याचे सिद्ध केले होते.

आता सोशल मीडियावर इंडोनेशियामध्ये झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा एक व्हिडियो फिरवला जातोय. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळील झालेल्या लाव्हाचा विस्फोट कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे. 16 जून रोजी हा उद्रेक झाल्याचे म्हटले आहे. निसर्गाच्या या रौद्ररुपाचा व्हिडियो नेटीझन्समध्ये झपाट्याने पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) या व्हिडियोची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । पोस्टमधील व्हिडियो येथे पाहा – अर्काइव्ह

काय आहे मेसेज/पोस्टमध्ये?

व्हॉट्सअ‍ॅपवर आणि फेसबुकवरील व्हिडियोमध्ये समुद्राच्या पाण्याखालून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचा एक मोठा लोट बाहेर पडताना दिसतो. मग हा गडद काळ्या रंगाचा लोट किनाऱ्यावरील शहराला गिळंकृत करतो. सोबतच्या पोस्ट/मेसेजमध्ये सांगितले जाते की, सुमात्रा येथे 16 जून 2019 रोजी दुपारी 4 वाजून 28 मिनिटांनी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा हा लाईव्ह व्हिडियो आहे.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील व्हिडियोचा स्क्रीनशॉट घेऊन त्याला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्यूबवरील एक व्हिडियो समोर आला. ऑकलंड वॉर मेमोरियल म्युझियमने हा व्हिडियो 2017 साली अपलोड केला होता. व्हिडियोचे शीर्षक आणि सोबतच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा कसा उद्रेक होऊ शकतो हे समजण्यासाठी हे व्हिडियो ग्राफिक्स तयार करण्यात आले होते. म्हणजे हा खरा उद्रेक नाही.

डेलीस्टार वेबसाईटनुसार, प्रा. रिचर्ड आर्क्युलस नावाच्या एका तज्ञाने ज्वालीमुखीमुळे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि न्यूझीलंड येथील ऑकलंड शहर उद्धवस्त होऊ शकते, असा इशारा दिला आहे. ही बातमी 12 जून रोजी प्रसिद्ध झाली होती. यासंबंधीच्या बातम्यांमध्ये वर दिलेला ग्राफिक व्हिडियो वापरण्यात आला. अनेकांनी या व्हिडियोलाच खरे मानून शेयर केले.

स्ट्रेंज क्लाऊड वेबसाईटनुसार, ज्वालामुखी उद्रेकाविषयी अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी, उद्रेकाच्या परिणामांविषयी अंदाज घेण्यासाठी संशोधनाचा भाग म्हणून हा व्हिडियो तयार करण्यात आला होता. उद्रेक झाल्यावर नेमके काय होऊ शकते हे दाखविण्याचा व्हिडियोमध्ये प्रयत्न करण्यात आला आहे.

मूळ आर्टिकल येथे वाचा – स्ट्रेंज क्लाऊड्सअर्काइव्ह

मग सुमात्रा बेटावरील उद्रेकाचे काय?

गार्डियन वेबसाईटनुसार, इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा येथील माऊंट सिनाबंग येथे 9 जून रोजी ज्वालामुखी उद्रेक झाला होता. या उद्रेकाचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. आकाशात सुमारे 7 किमी उंच राखेचे लोट गेले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

निष्कर्ष

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरील व्हायरल व्हिडियो इंडोनेशियातील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही. तो दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला एक सिम्युलेशन व्हिडियो आहे. तसेच इंडोनेशिया येथे 16 जून नाही तर, 9 जून रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे पोस्ट/मेसेजमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:VIDEO : इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक म्हणून “सिम्युलेशन” व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False