FACT CHECK: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे खरंच ज्वालामुखी निघाला का?

False सामाजिक

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील सिरसाळा या गावात 15 एप्रिलला जमिनीतून ज्वालामुखी बाहेर निघाला, असा दावा करणारा व्हिडियो सोशल मीडियावर पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या एका वाचकाने व्हॉटसअपवर (9049043487) मेसेज करून या व्हिडियोची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानुसार आम्ही यामागचे सत्य शोधले.

फेसबुकवरदेखील हा व्हिडियो व्हायरल झाला आहे. व्हिडियोमध्ये एका मोकळ्या जमिनीवर तप्त डांबरासारखा काळा घट्ट द्रव दिसतो. तसेच अधूनमधून ज्वालामुखीसदृश्य बुडबुडे आणि धूर जमिनीतून बाहेर पडताना दिसतो. काहींनी हा व्हिडियो शेयर करत लिहिले की, तालुक्यातील सिरसाळा येथे जमिनीतून ज्वालामुखी बाहेर पडून जाळ, धुर, आणि राख झाली. अनेकांनी भीतीदेखील व्यक्त केली.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

आम्ही तो व्हिडियो भू-वैज्ञानिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अशोक तेजनकर यांना पाठविला. तो पाहून त्यांनी सांगितले की, परळी भागामध्ये लाव्हारसापासून तयार झालेला बेसॉल्ट खडकाचे आडवे थर आहेत. याची जाडी दीड किलोमीटरपेक्षा जास्त आहे. लाव्हारस जमिनीखाली 80-90 किमी खोल असतो. त्यामुळे एवढ्या खोलवरून कठिण खडकाला छेदून जमिनीवर एवढ्या कमी प्रमाणात लाव्हारस येणे शक्य नाही. ज्वालामुखी जर बाहेर पडला असता तर भूकंपासारखे हादरे बसले असते.

सिरसाळा येथील घटनेचा व्हिडियो युट्यूबवरदेखील उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

याबाबत सिरसाळा भागातील पत्रकारांशी संपर्क साधला असता ज्वालामुखी निघाल्याचा व्हिडियो खोटा असल्याचे सांगण्यात आले. सिरसाळा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंते नामदेव सुतार यांनी सामना दैनिकाला तशी माहिती दिल्याचेही कळाले.

सामनाच्या वेबसाईटवरील 14 एप्रिल रोजीच्या या बातमीत सुतार यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसणारा लाव्हारस नसून तिथेच बाजूला असलेल्या 11 केव्हीच्या खांबामध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने तो प्रवाह खडकाळ जमिनीत जाऊन रिटर्न करंट तयार झाला आणि त्यातून तयार झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे हा लाव्हारस सदृश पदार्थ तयार होऊन बाहेर पडला.

मूळ बातमी येथे वाचा – सामनाअर्काइव्ह

याबाबत जेव्हा आम्ही भू-वैज्ञानिक डॉ. अशोक तेजनकर यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की, भूपृष्ठाखाली 40-50 फुटादरम्यान विद्युतप्रवाहामुळे खडकावर रासायनिक प्रक्रिया घडून हा काळा पदार्थ तयार झाला असावा. तो ज्वालामुखी किंवा लाव्हारस नाही.

भूपृष्ठाचा खडकावरील दाब कमी झाल्यास अतिउष्णतेमुळे खडक वितळून शिलारस तयार होतो. या शिलारसात अनेक वायू असतात. शिलारस खडकांना भेगा पाडून तो जमिनीवर साठतो. त्यामुळे शिलारसातील वायू वातावरणात मिसळतात. वायू बाहेर पडलेला शिलारस लाव्हारस म्हणून ओळखला जातो. (अधिक येथे वाचा – कुमार विश्वकोष)

निष्कर्ष

खांबात उतरलेला वीजप्रवाह कोरड्या खडकात शिरून तयार झालेल्या रिटर्न करंटमुळे हा प्रकार घडला. सिरसाळा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि भू-वैज्ञानिक यांनी ज्वालामुखी निघाल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे ज्वालामुखी निघाल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे खरंच ज्वालामुखी निघाला का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False