Fact Check : बलात्काराच्या आरोपीस पोलीस अधिक्षकांनी गोळ्या घालून यमसदनी धाडलं का?

False सामाजिक

युपीमधे ६ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नाझीलला IPS अजय शर्मा यांनी ऑन द स्पॉट गोळ्या घालून यमसदनी धाडलं, अशी पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अभिजीत पांडुरंग जाधव यांनी एक करोड हिंदूचा फेसबुक ग्रुप जो हिंदू अँड होइल त्याने १०० हिंदूना अँड करावे या ग्रुपवर ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / ARCHIVE
तथ्य पडताळणी

उत्तर प्रदेशात ६ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नाझीलला IPS अजय शर्मा यांनी ऑन द स्पॉट गोळ्या घालून यमसदनी धाडलं का याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर यासंदर्भातील वृत्ताचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.

Archive

पत्रिका या वृत्तपत्राच्या हिंदी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, अजय शर्मा हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आहेत. काही काळापूर्वी एका सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. त्या मुलीचा मृतदेह दोन दिवसापूर्वी सापडला होता. या प्रकरणात पोलिसांनी नाझिर नावाच्या एका व्यक्तीवर संशय होता. पोलिस त्याला पकडण्यास गेले असता नाझिरने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे नाझिर गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

पत्रिका / Archive

न्यूज स्टेट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसारही अजय शर्मा यांनी आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला आहे.

न्यूज स्टेट / Archive  

बीबीसी मराठीनेही या घटनेबद्दलचे वृत्त दिले आहे. या वृत्तात आरोपीने गोळीबार केल्यानेच पोलिसांनी गोळीबार केल्याचे अजय पाल शर्मा यांनी म्हटल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्यास गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल, असेही अजय पाल शर्मा म्हटल्याचे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. एबीपी न्यूजच्या हवाल्याने बीबीसीने हे वृत्त दिले आहे.  

बीबीसी मराठी / Archive
एबीपी न्यूज आणि अन्य वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना पोलिस अधिक्षक अजय पाल शर्मा यांनी दिलेली माहिती आपण खालील व्हिडिओत पाहू शकता.

रामपूर पोलिसांनी या घटनेबाबत केलेले ट्विटही आपण खाली पाहू शकता.

दैनिक लोकसत्ताने या घटनेबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तातही आरोपी जखमी असल्याचे म्हटले आहे.  

लोकसत्ता / Archive
तथ्य पडताळणी

बलात्काराचा आरोप असणाऱ्या आरोपीवर उत्तर प्रदेशमधील रामपूरचे पोलिस अधिक्षक अजय पाल शर्मा यांनी आरोपीने गोळीबार केल्याने प्रत्यूत्तरादाखल गोळीबार केला आहे. या घटनेत आरोपी गंभीर जखमी झाला आहे. आरोपीला पोलिसांनी यमसदनी धाडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीस यमसदनी धाडले हा दावा असत्य आढळून आला आहे.

Avatar

Title:Fact Check : बलात्काराच्या आरोपीस पोलीस अधिक्षकांनी गोळ्या घालून यमसदनी धाडलं का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False